केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यसभेत डॉ बी आर आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावर आक्षेप घेत अहमदाबाद येथील बार कौन्सिल ऑफ गुजरात (बीसीजी) चे सदस्य परेश वाघेला यांनी बीसीजीच्या सार्वजनिक कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. ३० डिसेंबर रोजी शाह यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कथित अपमानाबद्दल शाह यांनी माफी न मागितल्यास कार्यक्रमावर बहिष्कार घालू, असेही परेश वाघेला यांनी सांगितले.
बीसीजी BCG ने ३० डिसेंबर रोजी अहमदाबाद येथील सायन्स सिटीच्या विज्ञान भवनात बीसीजी BCG च्या राज्य रोलवर नव्याने नावनोंदणी झालेल्या वकिलांसाठी शपथविधी समारंभ आयोजित केला आहे. एकूण ६,००० नव्याने नावनोंदणी केलेले वकिल शपथ घेणार आहेत.
एका इंग्रजी संकेतस्थळाशी बोलताना परेश वाघेला म्हणाले, “ज्यांच्या नेतृत्वाखाली राज्यघटना तयार करण्यात आली आहे अशा व्यक्तीचा तुम्ही (शाह) अपमान केलात आणि तीन दिवस माफी मागितली नाही, तर तुमची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात (प्रमुख पाहुणे म्हणून) मी उपस्थित का राहावे? असा सवालही यावेळी केला.
दरम्यान, बीसीजी BCG चे अध्यक्ष जे जे पटेल यांनी परेश वाघेला यांच्यावर वैधानिक संस्थेच्या “गैर-राजकीय कार्यक्रमात राजकारण” करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
जे जे पटेल पुढे बोलताना म्हणाले की, ते (वाघेला) शुद्ध काँग्रेसी आहेत: काँग्रेस कायदेशीर सेलचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या पत्नीनेही (महानगरपालिका) निवडणूक लढवली आणि हरली. राजकीय पार्श्वभूमीवर तो वाट्टेल तो निषेध करू शकतो, पण बीसीजीच्या व्यासपीठावरून तो करू नये. बीसीजी BCG ही गुजरातच्या सर्व वकिलांची मूळ संस्था आहे आणि त्यांच्या विनंतीवरून अमित शाह येत आहेत. या कार्यक्रमात कोणीही राजकीय अजेंडा आणू नये. गुजरातच्या वकिलांचा हा कार्यक्रम आहे. बीसीजी ही एक गैर-राजकीय वैधानिक संस्था आहे आणि अमित शाह गुजरातच्या सर्व वकिलांचे पाहुणे असल्याचे सांगितले.
यावर परेश वाघेला म्हणाले की, मी दलित आणि आंबेडकरवादी म्हणून या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. त्याचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही. माझ्या भावना दुखावल्या गेल्याने मी हे जाहीर केल्याचे सांगितले.
जे जे पटेल यांनी असेही सांगितले की, परेश वाघेला बीसीजीच्या सर्व बोर्ड मीटिंगमध्ये उपस्थित होते. जिथे शाह यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता, वाघेला यांनी तेव्हा संमती दिली होती असा आरोपही केला.
पुढे बोलताना जेजे पटोले म्हणाले की, बीसीजी हा कार्यक्रम पूर्ण ताकदीने आयोजित करणार आहे आणि त्यात “विक्रमी संख्येने” वकील असतील. या कार्यक्रमासाठी सर्व बार असोसिएशनचे प्रतिनिधी, बार कौन्सिल ऑफ इंडियाची संपूर्ण टीम आणि सर्व राज्य बार कौन्सिलचे अध्यक्ष/उपाध्यक्ष येणे अपेक्षित असल्याचे सांगितले.
अमित शाह यांच्याशिवाय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्याचे कायदा मंत्री रुषिकेश पटेल, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि गुजरातचे महाधिवक्ता कमल त्रिवेदी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राज्यसभेत मंगळवारी “भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासा’वर दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना अमित शहा यांनी कथित आक्षेपार्ह टिप्पणी केली.
अमित शाह यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेत हा आंबेडकरांचा अपमान असल्याचे सांगितल्याने शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर त्यांच्याविरोधात चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला होता.
Marathi e-Batmya