जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण : घटनेच्या तासभरआधी चेतनने समस्या सांगितली माजी आरपीएफ जवानाचा सत्र न्यायालयात दावा

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून वरिष्ठासह तीन प्रवाशांची हत्या केल्याच्या आरोपांखाली अटकेत असलेला रेल्वे पोलीस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतन सिंह चौधरीने घटनेपूर्वी काही तास आधीच त्याच्या आरोग्याच्या समस्येबाबत आपल्याला सांगितले होते. त्यापूर्वी, त्याने कधीच आपल्याला याबाबत सांगितले नसल्याचा दावा आरपीएफच्या माजी सुरक्षा अधिकाऱ्याने मंगळवारी दिंडोशी सत्र न्यायालयात केला.

चेतनसिंहच्याविरोधात दिंडोशी न्यायालयात खटला सुरू आहे. त्यावेळी, साक्ष देताना या माजी सुरक्षा अधिकाऱ्याने हा दावा केला. घटनेच्या दिवशी आपण मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर तैनात होतो आणि आपल्याकडे बंदोबस्तासाठी कर्मचाऱ्यांना तैनात करण्याची जबाबदारी होती. घटनेच्या अवघ्या एक तास आधी चेतनने त्याच्या आरोग्याच्या समस्येबाबत आणि तो हालचाल करू शकत नसल्याचे सांगितले होते. चेतनसह गोळीबारात मृत्यूमुखी पडलेले वरिष्ठ अधिकारी टिकाराम मीणा यांना जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये तैनात केले होते. घटनेच्या दिवशी पहाटे सव्वाचारच्या सुमारास बंदोबस्तासाठी कर्मचारी तैनात करण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या मीणा यांनी आपल्याला फोन केला आणि चेतनची तब्येत ठीक नसून तो काम करू शकत नसल्याचे कळवले. परंतु, शेवटच्या क्षणी चेतनला कर्तव्य बजावण्यापासून दिलासा दिला जाऊ शकत नसल्याचे सांगण्यात आल्यावर आपण चेतनशी बोललो. त्यावेळी, त्याने त्याला भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्येबाबत आपल्याला सांगितल्याचे अधिकाऱ्याने साक्ष देताना न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, चेतन हा मानसिक रुग्ण असून घटनेच्या वेळीही त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती, असा दावा बचाव पक्षाचा आहे. तर, अकोला कारागृह अधीक्षकांनी दिंडोशी सत्र न्यायालयाला पत्रव्यवहार केला होता. त्यात, चेतनची प्रकृती १९ डिसेंबर रोजी बिघडल्यामुळे, त्याला वैद्यकीय उपचारांसाठी अकोला येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याची तपासणी केल्यानंतर, त्याच्यात मानसिक आजाराची लक्षणे आढळून आल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. तसेच, चेतनला पुढील उपचारांसाठी नागपूर येथील प्रादेशिक मानसिक रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केल्याचे कारागृह अधीक्षकांनी पत्रात म्हटले होते. न्यायालयाने या पत्राची दखल घेऊन चेतनला अकोला कारागृहातून ठाणे येथे आणण्यात यावे आणि तेथील मनोरुग्णालयात तपासणीसाठी दाखल करावे, असे आदेश दिले होते.

About Editor

Check Also

ममता बॅनर्जी यांचा सर्वोच्च न्यायालयात आरोप, निवडणूक आयोग व्हॉट्सअप कमिशन बनलेय एसआयआरच्या विरोधात मुख्यमंत्री ममता बँनर्जी सर्वोच्च न्यायालयात स्वतः हजर

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात स्वतः हजर झाल्या आणि त्यांनी पश्चिम बंगालमधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *