भारताचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) चे कार्यकारी संचालक कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ सहा महिने शिल्लक असतानाच पद सोडले आहे. सुब्रमण्यम यांना ऑगस्ट २०२२ मध्ये सरकारने या पदासाठी नामांकित केले होते आणि १ नोव्हेंबर २०२२ पासून ते आयएमएफचे कार्यकारी संचालक (ईडी) म्हणून काम करू लागले.
आयएमएफच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्यांचे नाव २ मे पर्यंत ईडी म्हणून सूचीबद्ध होते. ३ मे पासून, भारत, बांगलादेश, भूतान आणि श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदारसंघातील कार्यकारी संचालक पद “रिक्त” म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे.
आयएमएफच्या कार्यकारी संचालक पदी नियुक्ती होण्यापूर्वी कृष्णमुर्ती सुब्रमण्यम यांनी २०१८ ते २०२१ दरम्यान भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम केले होते. आयएमएफचे कार्यकारी मंडळ २४ कार्यकारी संचालकांनी बनलेले असते, जे सदस्य देशांद्वारे किंवा देशांच्या गटांद्वारे निवडले जातात, तसेच त्याचे अध्यक्ष म्हणून काम करणारे व्यवस्थापकीय संचालक देखील असतात. आयएमएफच्या दैनंदिन कामकाज आणि धोरणात्मक निर्णयांवर देखरेख करण्यासाठी बोर्ड नियमितपणे बैठका घेते.
९ मे रोजी होणाऱ्या आयएमएफच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीपूर्वी सुब्रमण्यम यांचे पद सोडले गेले आहे, ज्यामध्ये पाकिस्तानसाठी निधी व्यवस्थांचा आढावा घेतला जाईल. दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी संबंधित चिंता उद्धृत करून भारत या बैठकीत पाकिस्तानला आणखी आर्थिक मदत करण्यास विरोध करेल अशी अपेक्षा आहे.
२ मे रोजी, नेब्रास्कामधील ओमाहा येथे डोअरदर्शी अॅडव्हायझर्सने आयोजित केलेल्या ‘इन्व्हेस्टिंग अपॉर्च्युनिटीज इन इंडिया’ या परिषदेत सुब्रमण्यम बोलणार होते. नंतर आयोजकांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की ते आता आपत्कालीन परिस्थितीमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.
सुब्रमण्यम यांचे पूर्ववर्ती, अर्थशास्त्रज्ञ सुरजित भल्ला यांनी नोव्हेंबर २०१९ पासून भारताचे आयएमएफ कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले होते आणि २०२० मध्ये अतिरिक्त दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांची पुन्हा निवड झाली.
Marathi e-Batmya