भारतीय जनता पक्षाने आणलेले डिलिमीटेशन विधेयक हे राष्ट्रविरोधी असून लोकशाहीची थट्टा करणारे आहे. हे विधेयक पास झाले तर देशात प्रादेशिक असमतोल होऊन अराजक माजेल पण भाजपाला तेच हवे असून केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी देशहित व लोकशाही मुल्ये पायदळी तुटवत हे विधेयक पास करण्याचा घाट घातला आहे. काँग्रेसचा डिलिमीटेशन विधेयकाला पहिल्यापासून विरोध असून इंडिया आघाडीतील घटक पक्षांचाही विरोध आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, डिलिमीटेशन विधेयक पास करून नंतर जातीवर, धर्मावर आधारीत मतदारसंघ निर्माण करायचे, जातीय व भाषिक दंगली घडवायच्या आणि निवडणूका जिंकायचा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव आहे. हे विधेयक देशाच्या व महाराष्ट्राच्या विरोधात आहे. महाराष्ट्राला गायपट्टा करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. राज्यातील लोकसभेच्या सध्याचा ४८ जागा विधेयक मंजूर झाले तर ७२ होतील पण गायपट्ट्यातील जागा मात्र त्यापेक्षा जास्त असतील. ५० टक्के जागा वाढल्या तरी अंतर मात्र जास्त असेल व गायपट्टयाचे वर्चस्व वाढेल आणि इतर राज्यांचे खच्चीकरण होईल. महिलांसाठी सध्याच्या जागांमधूनच ३३ टक्के जागा लागू कराव्यात व २०२९ आधी महिला विधेयक लागू करावे. काँग्रेसची भूमिका जी आहे तीच इंडिया आघाडीची भूमिका आहे. मागील वेळेस डिलिमीटेशन विधेयक आले त्यावेळी इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी विरोध केला होता व आताही ते विरोधच करतील अशी अपेक्षा आहे.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, डिलिमीटेशन विधेयकासाठी देशात वातावरण निर्मिती केली जात आहे, एक नेरेटिव्ह पसरवला जात आहे. हे विधेयक पास करण्यासाठी भाजपा कोणत्याही स्तराला जात असून विधेयकासाठी भाजपा दडपशाही करत आहे, पक्ष फोडत आहे, कोट्यवधी रुपयांची आमिषे दाखवली जात आहेत. ‘पैसा फेक तमाशा देख’, चा खेळ देशभर सुरु आहे. पण केवळ आमदार-खासदारांची संख्या वाढवून काय करणार? १४० कोटी देशाचा मालक १४० कोटी जनता आहे. या विधेयकातून जनतेच्या हाती काय लागणार? केवळ पाच हजार आमदार-खासदार देशाचे प्रतिनिधीत्व करू शकणार नाहीत तर सत्तेचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे अधिकार वाढवले पाहिजेत, त्यांना मजबूत करण्याचे काम केले पाहिजे.
शरद पवार यांच्या NCP पक्षाबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीतील मित्र पक्ष NCP (SP) या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या येत आहेत. शरद पवार यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास शिव, शाहु, फुले व आंबेडकर विचारांचा राहिला आहे. ते भाजपाच्या कुटील डावात अडकणार नाहीत. डिलिमीटेशन विधेयकाला शरद पवार व त्यांचा पक्ष पाठिंबा देणार नाही तर विरोधात मतदान करतील अशी अपेक्षा आहे, असेही सपकाळ म्हणाले..
Marathi e-Batmya