उद्योजक असूनही केंद्राच्या नीतीवर भाष्य करणारे ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे निधन वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या आधी त्यावेळचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत उद्योजकांची एक बैठक बोलाविली होती. त्यावेळी केंद्र सरकारच्या कोणत्या धोरणावर नाराजी आहे किंवा त्यात सुधारणा करण्यासंदर्भात अमित शाह यांनी उपस्थित केला. परंतु स्वत:च्या उद्योगावर केंद्र सरकार आकसाने कारवाई करेल की नाही याची भीती न बाळगता बजाज ऑटोचे आधारवड राहुल बजाज यांनी अमित शाह यांच्यासमोरच केंद्राच्या वाहन उद्योगासंदर्भात असलेल्या धोरणावर आणि ठराविक उद्योजकांना जवळ करण्याच्या वृत्तीवर टीका केली. असे निडर ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे आज शनिवारी पुण्यात निधन झाले.

ते ८३ वर्षाचे होते. त्यांच्या निधनमामुळे बजाज उद्योग समूहाचा मोठा आधारस्तंभ हरपला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु होते.

आजारपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ते मागील काही दिवसांपासून दाखल होते. वयोमान आणि हृदयाच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांचे मल्टी ॲार्गन फेल्यूअरमुळे निधन झाले.

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता. बजाज उद्योग समूहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि विधी विभागातील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, त्यानंतर हॉवर्ड विद्यापीठातून एमबीएचे देखील शिक्षण घेतले होते.

१९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये ते कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. मागील वर्षीच त्यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जवळपास पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. बजाज ऑटोला यशोशिखरावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नीरज बजाज यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती.

राहुल बजाज यांच्या जाण्याने उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. सर्वचस्तरातून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे आदींनी राहुल बजाज यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

 

About Editor

Check Also

भारतीय शेअर बाजार जोरदार तेजीसह बंद, रिअल्टी आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार जोरदार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स ४४७.५५ अंकांनी म्हणजेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *