प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन, आरोग्य विभागातील विविध पदांची भरती टप्प्याटप्प्याने तारांकित प्रश्नोत्तराच्या वेळी दिली माहिती

आरोग्य विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने जिथे काम सुरू आहे तिथे नियमानुसार  कार्यवाही केली जात आहे. आरोग्य विभागातील पदभरती करण्याकरिता नवीन आकृतिबंध तयार करण्यात येत असून, विविध पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तरावेळी सांगितले. सदस्य नाना पटोले यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आरोग्य विभागातील पदभरती करण्याकरिता नवीन आकृतिबंध तयार करण्यात येत असून, विविध पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान  अंतर्गत सुमारे १० हजार कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या सेवासंबंधीही  निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू आहे. आरोग्य विभागात कंत्राटी  पध्दतीने गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत असून, त्यांच्या वेतन आणि हक्कांबाबत तक्रारी आल्यास त्या गांभीर्याने घेतल्या जातील. कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करताना सेवा अधिक परिणामकारक करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी सदस्य हेमंत ओगले, भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित करुन चर्चेत सहभाग घेतला.

राज्यात लवकरच नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या जाणार

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा १०८ (टोल फ्री क्रमांक) रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. मात्र याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने यामध्ये त्रुटी दूर करून वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच १७३७ नवीन १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे  विधानसभेत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

राज्यात सुरू असलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेबाबत सदस्य गोपिचंद पडळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मंत्री  प्रकाश आबिटकर यांनी उत्तर दिले.

मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, १०८ रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा दिल्या जात आहेत. ही संपूर्ण सेवा करार आणि सामंजस्य करार पद्धतीने एजन्सीद्वारे चालवली जाते. संबंधित एजन्सींनी किमान वेतन कायद्याचे पालन करून त्यांच्या कर्मचाऱ्यांना योग्य वेतन देणे बंधनकारक आहे. या जबाबदारीत कुठलीही त्रुटी आढळल्यास शासनाकडून कारवाई केली जाईल, या संदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाने १०८ रुग्णवाहिका सेवेसाठी चौकशी समिती नेमली आहे. या समितीद्वारे सेवेमधील त्रुटी दूर करून कामकाज अधिक गतिमान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे, असे सांगितले.

यावेळी सदस्य शरद सोनावणे, राजेश पवार,भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित करुन चर्चेत सहभाग घेतला.

About Editor

Check Also

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या नेतृत्वाखाली समिती

मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *