आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या ५ पुनर्वसन इमारतींतील एकूण ८६४ पात्र रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरुपात सदनिकांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट येथे सोमवार, १६ मार्च, २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात येणार आहे. यामध्ये ४२३ सदनिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या पोलिस विभागातील निवृत्त पोलीस, त्यांचे वारस व कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांकरिता आहेत.
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रकल्पांतर्गत नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’ असे नामकरण करण्यात आले आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात दोन पुनर्वसन इमारतीत एकूण २० टॉवर बांधण्यात येणार आहेत. यात पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पुनर्वसन इमारत क्रमांक ०१ मधील एकूण ८ टॉवर्स पैकी ५ टॉवर्समधील ८६४ सदनिकांच्या वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या ६.४५ हेक्टर जागेवर तळ अधिक ३ मजल्यांच्या ४२ चाळींमध्ये ३३४४ भाडेकरू वास्तव्यास आहेत. दोन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये नायगाव बीडीडी चाळीतील प्लॉट ‘ब’ मधील १४०१ रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामध्ये ८ पैकी ५ पुनर्वसन इमारतींतील ८६४ सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान केल्या जात आहेत. उर्वरित ५३७ सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून एप्रिल २०२६ मध्ये हे काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प राबवितांना एकूण भूखंडापैकी सुमारे ६५ टक्के जागेचा वापर पुनर्वसनासाठी करण्यात आला आहे.
तसेच प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्लॉट ‘अ’ मधील १९ चाळींच्या जागेवर प्रस्तावित १२ पुनर्वसन इमारतींपैकी ३ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत चाळींतील रहिवाशांचे तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतरण करण्यात आले आहे. तसेच चाळीतील रहिवाशांना भाडे किंवा संक्रमण गाळे यापैकी पर्याय निवडण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात आला. निवासी व अनिवासी गाळेधारकास २५ हजार रुपये प्रति महिना ११ महिन्यांचे आगाऊ भाडे देण्यात येत आहे.
सुमारे दोन ते तीन पिढ्यांपासून १६० चौरस फुटाच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडामार्फत पुनर्वसन इमारतीत ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त २ बीएचके स्वरुपातील सदनिका मालकी तत्त्वावर विनामुल्य वितरित केली जाणार आहे. पुनर्वसन सदनिकेत व्हिट्रीफाईड टाईल, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रानाईट स्वयंपाकाचा ओटा, अग्निरोधक यंत्रणा यासह ब्रांडेड प्लंबिंग फिटिंग्स आदी सारख्या अनेक सुविधा देण्यात आल्या असून भूकंप रोधक तंत्रज्ञानवर आधारित उभारलेल्या या इमारतींमध्ये दोन पॅसेंजर लिफ्ट, एक फायर लिफ्ट, सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ३ मजल्यांचे बेसमेंट पार्किंग, स्टील्ट एरिया आणि प्रशस्त जिने आहेत.
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एक स्वयंपूर्ण वसाहतीचे निर्माण होणार असून यामध्ये स्वतंत्र शाळेची इमारत, स्वतंत्र वेलफेअर सेंटर आदी सुविधांचे नियोजन करण्यात आले असून मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्यजल संचयन आदी सुविधा असणार आहेत. तसेच या प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींच्या सामायिक सोयी सुविधांची ‘म्हाडा’तर्फे बारा वर्षे देखभाल केली जाणार आहे.
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील लाभार्थ्यांना हा कार्यक्रम घरबसल्या पाहता यावा यासाठी म्हाडातर्फे सदर कार्यक्रमाचे वेबकास्टिंग करण्यात येणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या अधिकृत @mhadaofficial या यूट्यूब तसेच फेसबुक चॅनलवरून करण्यात येईल.
तसेच प्रकल्पातील वयोवृद्ध व इतर लाभार्थ्यांच्या सोयीसाठी मंडळातर्फे प्रकल्पस्थळी, म्हणजेच नायगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील पुनर्वसन इमारत क्रमांक टी–६ व टी–७ यांच्या आवारात विशेष मंडप उभारण्यात येणार आहे. या मंडपात सुमारे ५०० नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित सदनिका वितरण समारंभाचे थेट प्रक्षेपण मोठ्या एलईडी पडद्यांवर पाहण्याची सुविधा ‘म्हाडा’तर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
देशातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता म्हाडा सुकाणू अभिकरण (नोडल एजन्सी) म्हणून म्हाडा सक्षमतेने कार्य करीत आहे. दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील ५५६ सदनिकांचे वितरण करण्यात आले. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मुंबईतील वरळी, ना.म. जोशी मार्ग-परळ, नायगाव येथील सुमारे ८६ एकर जागेवर वसलेल्या १९५ चाळींचा समावेश असून १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. ना. म. जोशी मार्ग-परळ प्रकल्पामध्ये २ हजार ५६० निवासी व अनिवासी गाळे असून १४ पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. वरळी येथे ९६८९ निवासी व अनिवासी गाळे असून ३४ पुनर्वसन इमारती उभारण्यात येत आहेत. नायगाव (दादर) येथे ३ हजार ३४४ निवासी व अनिवासी गाळे असून २० पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम सुरू आहे.
Marathi e-Batmya