दिशा सालियनच्या पालकांची आर्त हाक, “आम्हाला शांत जगू द्या, मुलगी गेल्याचं…” महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भेटीनंतर पालकांनी केली विनंती

दिशा सालियनच्या मृत्यूबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केल्यानंतर सालियनच्या पालकांनी कुटुंबियांनी आर्त हाक दिली असून आम्हाला शांतपणे जगू द्या, मुलगी गेल्याचं दु:ख काय असतं तुम्हाला कळणार नाही अशी भावनिक सादही घालत आम्हाला काही झाले तर हे लोक जबाबदार असतील असा इशाराही दिला.

यापूर्वीही केंद्रीय मंत्री नारायण राणे अशीच वक्तव्य केल्यानंतर सालियनच्या वडीलांनी जाहीर पत्र लिहीत प्रसारमाध्यमांना आणि राजकिय नेत्यांना आवाहन करत तीच्याबाबत आरोप करू नका अशी विनंती करत सीबीआयच्या तपासात माहिती बाहेर आल्याचे स्पष्ट केले.

नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर राज्य महिला आयोगाने मालवणी पोलिसांना आदेश देत यासंदर्भात अहवाल ४८ तासात सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियनच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी या राजकारामुळे माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, आम्हाला काही झाले तर हे लोक जबाबदार असतील अशी प्रतिक्रिया दिशाच्या आईने व्यक्त केली.

दिशा सालियनची हत्या झाल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत करत हत्येआधी बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर महिला आयोगाने यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

आम्ही दोन वर्षापूर्वीच या प्रकरणाची माहिती दिली होती. तरीही हे सर्वजण पुन्हा तेच आणत आम्हाला त्रास देत आहेत. या राजकारामुळे माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आम्ही रोज मरत आहोत. राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. या लोकांमुळे आम्हाला जगावे असं वाटत नाही. आमचे जर काही झाले तर हे लोकच जबाबदार असतील असा इशारा दिला.

कोणत्याही राजकारण्याने, अभिनेत्याने आम्हाला आता त्रास देऊ नये. आम्हाला जगू द्या. महापौरांनी येऊन आमचे सांत्वन केले. आम्ही घराबाहेरही पडत नव्हतो. आता थोडासा श्वास घेत आहोत, तर पुन्हा त्रास दिला जात आहे. आम्हाला थोडं जगू द्या हेच आम्हाला सांगायचे आहे. ज्याप्रकारचे राजकारण सुरु आहे, त्यावरुन आम्ही खूप नाराज आहोत. आम्ही या नेत्यांना मत देतो आणि हेच आमची आणि माझ्या मुलीची बदनामी करत आहेत. माझी मुलगी गेली आहे. त्याचे दुःख आम्ही सहन करत आहोत. पण या लोकांना काय हक्क आहे आमची बदनामी करण्याचा?, असा सवालही सालियनच्या आईने करत आम्ही यासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. माझी विनंती आहे की आम्हाला त्रास देऊ नका. आम्ही मुलीला गमावले आहे त्याचे दुःख तुम्हाला कळत नाही. आमच्या नावाची बदनामी झाली तर आम्हीसुद्धा काहीतरी करुन घेऊ आणि यासाठी हेच लोक जबाबदार असतील. पोलिसांकडे सगळे पुरावे आहेत. आरोप केले आहेत तसे काहीसुद्धा झालेले नाही. शवविच्छेदनामध्येही काहीही आढळलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाच्या दोन वर्षानंतरसुद्धा दिशा सालियनच्या आई वडिलांना त्रास होईल अशी वक्तव्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याकडून केली जात आहेत. सर्व पुराव्यांवर अविश्वास दाखवला जात आहे. त्या दिवशी पार्टीसाठी दिशाचे लहाणपणीचे मित्र होते असे तिच्या पालकांनी सांगितले. आठवडाभर आधी एका व्यावसायिक कामात यश न मिळाल्याने ती तणावात होती. त्यामुळे तिने ते मनाला लावून घेतले आणि तिने आत्महत्या केली. दिशाची व्यवसायाव्यतिरिक्त कोणासोबतही मैत्री नव्हती. ती सुशांत सिंहची व्यवस्थापक नव्हती. सुशांतला ती एकदाच भेटली होती असे तिच्या आई वडिलांनी स्पष्ट केले. मुंबई पोलिसांनी सर्व तपास केला आहे. मी तक्रार केल्यानंतर दिशाच्या वडिलांनी आम्हाला भेटायला बोलवल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *