मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो २बीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन संपन्न मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे शहर बनविण्याचा संकल्प

मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या माध्यमातून नागरिकांना अखंड आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाईन २ ब (डी.एन. नगर ते मंडाले) चा पहिला टप्पा देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन ते मंडाले या मार्गाचे लोकार्पण तसेच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन झाले. चेंबूर येथील देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन मेट्रो स्थानक येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आमदार सना मलिक, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई मेट्रो लाईन 2 ब (डी.एन. नगर ते मंडाले) च्या कोनशिलेचे अनावरण तसेच पॉड टॅक्सीसंदर्भातील बीकेसी कनेक्ट कंपनीने तयार केलेल्या कॉफीटेबल बुकचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

मेट्रो 2 ब चा ५.६ किमीचा पहिला टप्पा आणि पाच स्थानके आजपासून सुरू होत असून उर्वरित दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुसंगत आणि जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण मुंबई एकमेकांशी प्रभावीपणे जोडली जाणार असून, भविष्यात बीकेसी, अंधेरी, वांद्रे आणि चेंबूरपर्यंत अखंड प्रवास सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे ही मेट्रो हार्बर लाईनला जोडणारी पहिली मेट्रो ठरत असल्याने वाहतूक व्यवस्थेत नवा अध्याय सुरू होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पातील सर्व स्थानके आयजीबीसी प्लॅटिनम मानांकित असून ऊर्जा बचत आणि नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर यावर भर देण्यात आला आहे. मंडाले येथे उभारण्यात आलेला दुहेरी मजल्याचा डेपो देशातील सर्वात मोठ्या डेपो पैकी एक असून दोन मजल्यांमध्ये ७२ लाईन्सची सुविधा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई व मुंबई महानगर प्रदेशात एकूण ३३७ किमी मेट्रो नेटवर्क उभारण्याचे उद्दिष्ट असून, पूर्ण झाल्यानंतर दररोज सुमारे ७०  लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करू शकतील. त्यामुळे सध्या उपनगरी रेल्वेवरील ९० लाख प्रवाशांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी बीकेसी परिसरात ‘पॉड टॅक्सी’ या नाविन्यपूर्ण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे ई भूमिपूजन करण्यात आले. या स्वयंचलित प्रणालीद्वारे प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी १००-१५० मीटर अंतरावर पोहोचता येणार असून, बीकेसीमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबविण्यात येणार असून, २० महिन्यांत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्परतेने सहकार्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले. या प्रकल्पासाठी योगदान देणाऱ्या अभियंते, कामगार, कंत्राटदार आणि एमएमआरडीएच्या संपूर्ण टीमचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष कौतुक करत आभार मानले.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मेट्रो २बी ही पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मुंबईला जोडणारी महत्त्वाची लाईन असून, हार्बर लाईनवरून प्रथमच मेट्रोला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे मेट्रो १, मेट्रो ३, मेट्रो ४, पश्चिम रेल्वे, मोनोरेल आणि हार्बर लाईन यांच्यात सुसूत्र जोडणी होणार आहे. सुमारे १०,९८६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातील पहिला टप्पा ३,२२५ कोटी रुपयांचा असून, मंडाले डेपो हा या प्रकल्पाचा कणा ठरणार आहे.

सुमारे ३०.४५ हेक्टर क्षेत्रावर उभारला जाणारा हा डेपो देशातील सर्वात मोठा मेट्रो डेपो असेल. तसेच हा प्रकल्प ग्रीन मोबिलिटीचा उत्कृष्ट नमुना असून सर्व स्थानकांना आयजीबीसी ग्रीन प्लॅटिनम रेटिंग मिळाले आहे.

या मेट्रो मार्गामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणालाही हातभार लागणार आहे. नागरिकांना अधिक आरामदायी, जलद आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

मेट्रो २बी प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार असून मार्च २०२७ पर्यंत संपूर्ण मार्ग कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे मुंबईत मल्टी-मोडल वाहतूक व्यवस्था निर्माण होईल आणि भविष्यातील ३३७ किमी मेट्रो नेटवर्क पूर्ण झाल्यावर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशातील पहिल्या पॉड टॅक्सी प्रकल्पालाची आज मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून, ही सेवा लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. हा प्रकल्प दुबई आणि लंडनमधील सुविधांच्या धर्तीवर उभारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून असे प्रकल्प साकार होत असल्याचे नमूद करत, राज्य सरकार वेगाने विकासकामे राबवत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील विविध पायाभूत प्रकल्पांमुळे शहराचा सर्वांगीण विकास होईल आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मान्यवरांनी चेंबूर येथील देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन मेट्रो स्थानक ते देवनार मेट्रो स्थानक दरम्यान मेट्रोतून प्रवास केला.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांचे आदेश, मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश १ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १ मेपर्यंत अहवाल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *