मुंबईतील रस्त्यांवरून भाजपा आमदारांकडून उपमुख्यमंत्र्यांचा नगरविकास विभाग लक्ष्य उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेणार असल्याची उदय सामंत यांची माहिती

मुंबईतील रस्त्यांचे वेगाने काँक्रिटीकरण करणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील सर्व आमदारांच्या मागण्या जाणून घेतल्या जातील आणि त्या लवकरच पूर्ण केल्या जातील, अशी माहिती उद्येाग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर सदस्य अमित साटम, अमित देशमुख, आदित्य ठाकरे, योगेश सागर, मुरजी पटेल,अमीन पटेल, वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारले.

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपाचे अमित साटम यांनी, मुंबईतील मेट्रोसाठी आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून ते रस्ते तसेच अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यांवर वाहतूकींचा खोळंबा होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

तर आदित्य ठाकरे यांनीही, रस्त्याच्या काँक्रेटीकरणाचा मुद्दा उपस्थित करत त्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेच्या प्रक्रियेत मोठा घोळ असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शणास आणून दिली. तसेच रस्त्याच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची गरजही व्यक्त केली.

त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असून काही कामांमध्ये तडे आढळून आल्याने संबंधित कंत्राटदार आणि गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेवर कारवाई करण्यात आली आहे. दोषयुक्त कामाचे प्रमाण एकूण कामाच्या ०.४ टक्के इतके असून, दोषयुक्त कामांसाठी कंत्राटदार आणि गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेवर प्रत्येकी ३.३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोषयुक्त काम कंत्राटदाराकडून स्वखर्चाने नव्याने करून घेतले जात आहे. तसेच, पर्यवेक्षण करणाऱ्या ९१ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागवण्यात आला आहे.

या रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचेही उद्येाग मंत्री सामंत यांनी सांगितले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावीतील शाहूनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा बेताल व उद्धट पोलिस निरिक्षकांवर योग्य ती कारवाईची केली मागणी

भाजपा महायुती सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ असून सत्ताधारी पक्षातील नेते दादागिरी करत आहेतच पण आता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *