देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, मी पळणार नाही तर लढणारा विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकेपर्यंत थांबणार नाही

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेला खोटा प्रचार फार दिवस टिकणारा नाही. विरोधकांच्या अपप्रचाराला योग्य उत्तर देऊन विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकविल्याखेरीज मी थांबणार नाही, आणि तुम्हीही थांबू नका असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत हा देवेंद्र फडणवीस पळणारा नाहीतर लढणारा असल्याची स्पष्टोक्ती भाजपा आमदारांच्या बैठकीत बोलताना दिली.

भाजपा आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष आ.आशीष शेलार, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ.प्रवीण दरेकर आदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय सरकार मंजूर नाही, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालाची आकडेवारी मांडून महायुतीचा पराभव झाला हा प्रचार खोटा असल्याचे दाखवून दिले. या निवडणुकीमध्ये भाजपाचे नेतृत्व मी केल्यामुळे या निकालाची जबाबदारी माझी आहे. आपण सर्वांनी अतिशय उत्तम काम केलं. केवळ राजकीय गणित जुळवाजुळवीमध्ये आम्ही कमी पडलो. मला मोकळं करून काम करायची संधी द्या, असे मी निराशेतून बोललो नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस हा पळणारा नाही, तर लढणारा असल्याचे आवर्जून नमूग केले.

पुढे बोलताना देंवेंद्र बोलताना म्हणाले की, चारही बाजूनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहेत. कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो आहे आहे तर ते खरं नाही. माझ्या डोक्यात काही रणनीती होती आणि ती आजही आहे. उबाठा ला मुंबई महानगर क्षेत्रात मतदारांनी नाकारले असल्याचे सांगत आपल्या पेक्षा काही लाख मते इंडिया आघाडीला जास्त पडली असून असून अजूनही आपल्याला दिड ते दोन टक्के मते अधिकची मिळाल्यास आपणच पुन्हा विजय मिळवू अशी परिस्थिती असल्याचेही सांगितले.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, संविधान बदल, मराठा आरक्षण यासारख्या मुद्द्यावर खोटी माहिती पसरवून त्या आधारे महाविकास आघाडीने विजय मिळवला. हा खोटा प्रचार विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार नाही. त्या मुळे आपण सर्वांनी आतापासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहनही यावेळी केले.

यावेळी आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस हे बाहेर राहून सरकार मान्य नाही, असा ठराव मांडला. आ. शेलार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय आयुष्याचा लेखाजोखा जेव्हा मांडला जाईल तेव्हा त्यात २०१९-२४ या काळात त्यांनी संकटांचा मुकाबला कसा केला, याचा गौरवशाली अध्याय लिहिला जाईल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत सरकार भाजपा विधीमंडळ पक्षाला मान्य नाही. या ठरावाला उपस्थित सर्व आमदारांनी उभे राहून, टाळ्या वाजवून अनुमोदन दिले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्वतःला मागे ठेवून आमदार आणि कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीस काम करतात. ४२ खासदार आणि १२२ आमदार असा विक्रम मोदीजींच्या यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांनीच केला. देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये नसणे हे आम्हाला मान्य नाही असे सांगितले.

About Editor

Check Also

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा गौरव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खारघरमध्ये गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळा संपन्न

“धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *