एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ लॉटरीची ऑनलाईन सोडत ‘सिडको’चे हक्काचे घर मिळालेल्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडून अभिनंदन

सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यासारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहे. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र दिनी २१ हजार ३९९ नागरिकांना सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ याद्वारे हे स्वप्न पूर्ण होत असल्याने हक्काची घरे मिळालेले सर्वजण भाग्यशाली असून त्यांच्या अभिनंदनाची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, सिडकोचे अधिकारी तसेच लॉटरीत सहभागी झालेले नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लॉटरी असून यात नागरिकांना आपली पसंद नोंदविण्याची मुभा फक्त सिडकोने दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे देण्याची घोषणा केली असून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात घरे देण्याचा विक्रम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सिडकोची ही घरे टाटा, एल.एण्ड टी., शापूरची यांच्या सहभागाने बांधली असल्याने ती अतिशय दर्जेदार असून घरे रेल्वे स्टेशन्स, विमानतळाच्या जवळ असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होणार आहे. नवी मुंबईचे अतिशय वेगाने शहरीकरण होत असल्याने घरांची मागणी वाढली असल्याचे सांगितले.

पूर्वी नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी एक ते दीड तास लागत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आता अटलसेतूमुळे २० मिनिटात प्रवास होतो. आता ठाणे ते विमानतळ एक डेडीकेटेड कॉरिडोर करण्यात येणार असून त्याचबरोबर मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी या अर्थसंकल्पात देशात तीन कोटी घरे देण्याचे जाहिर केले असल्याने महाराष्ट्रात २० ते २५ लाख घरे नक्की बांधली जाणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईतून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्यासाठी गृहनिर्माणाच्या नवनवीन योजना आणल्या जात आहे. त्याचबरोबर सिडको, एमएमआरडीएम, एमएसआरडीसी, महाप्रित, बीएमसी, म्हाडा, एसआरए या सर्व संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प लवकर सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहिर केले. समुह विकास माध्यमातून सर्वांना खुली जागा, खेळाची मैदाने, शाळा, वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याचे सांगितले.

एमटीएचएल प्रकल्पाबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काही एनजीओ, पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पास विरोध दर्शवून या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईतून कमी होतील, असे सांगितले होते. मात्र त्यावेळी रिमुव्हर्स सर्कुलेशन ड्रेन, नॉईस बॅरिअर या तंत्रज्ञानांचा वापर केल्यामुळे एमटीएचएल प्रकल्पामुळे फ्लेमिंगोची संख्या कमी न होता आणखी वाढली. यावरून हे शासन प्रो इन्व्हायरमेंट प्रकल्प करते आहे, हे दिसून आले. आता नवीन गृहनिर्माण धोरण आणली जात असून यात सर्वांसाठी परवडणारी घरे, परवडणारी भाड्याची घरे, विद्यार्थी वसतीगृहे, काम करणाऱ्या महिलांसाठी घरे, ज्येष्ठ नागरिकांना घरे, गिरणी कामगार, डबेवाले आदींचा यात अंतर्भाव असल्याचे यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशाची चित्रफित तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभसंदेश वाचून दाखविण्यात आला.

About Editor

Check Also

मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *