इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी २६ मे २०२५ ते ३ जून २०२५ हा कालावधी देण्यात आला होता. ६ मे २०२५ च्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने ३१ मे रोजीच्या पत्रान्वये आदेश दिले असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.
या पत्रानुसार इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळाकरीता एक युनिट ग्राह्य धरण्यात येत आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यांमध्ये एक यूनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे.
या बदलाच्या अनुषंगाने संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने इन-हाऊस कोटामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक/ विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा यास्तव विद्यार्थी नोंदणी अंतिम ३ जून ऐवजी सुधारित मुदतवाढीसह आता ५ जून २०२५ रोजी दुपारी २ पर्यंत करण्यात येत आहे.
इयत्ता ११ वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थी/ पालक यांनी विद्यार्थी नोंदणी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यापुढील वेळापत्रक यापूर्वी प्रकाशित केल्याप्रमाणे राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
२ जूनपर्यंत १० लाख ८५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
आज २ जून २०२५ रोजी सायंकाळपर्यंत एकूण १० लाख ८५ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून पुणे विभाग- १,८७,९२५; मुंबई विभाग- २,६५,९००; कोल्हापूर विभाग- १,०७,०१२; छत्रपती संभाजीनगर विभाग- १,००,०४०; नाशिक विभाग- १,१२,१०८; नागपूर विभाग- ९५,२१०; अमरावती विभाग- ९८,३५९; लातूर विभाग- ५८,५८६ आणि इतर- ६१,७१२ अशी नोंदणी झाली असल्याची माहिती डॉ.पानझाडे यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी ई-मेल आयडी – support@mahafyjcadmissions.in अथवा हेल्पलाईन क्रमांक 8530955564 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Marathi e-Batmya