मुंबईः प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या कामकाजासाठी अनेक कर्मचारी, अधिकारी गुंतलेले असल्याने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि शिक्षकांना वेतन देणार नसल्याचे राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र याप्रश्नी सरकारी कर्मचारी संघटनेने कठोर भूमिका घेत पगार दिवाळीपूर्वीच मिळावी अशी मागणी केली. या मागणीला राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पगार दिवाळी पूर्वी देण्याचे आश्वासन दिले.
महिन्याच्या सुरूवातीलाच सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारकडून जारी करण्यात आले होते. मात्र त्यास दोन-तीन दिवसांचा कालावधी लोटत नाही, तोच या पुन्हा परिपत्रक काढत दिवाळीपूर्वी वेतन देता येणे शक्य नसल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. त्यामुळे दिवाळीसारखा मोठा सण असताना हाती पगार राहणार नसल्याने सरकारी कर्मचारी आणि शिक्षक हवाल दिल झाले होते. याप्रश्नी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने सरकारच्या या पवित्र्याबाबत नाराजी आणि संताप व्यक्त केला.
त्यामुळे अखेर राज्याचे मुख्य सचिव मेहता यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावून घेत यावर तोडगा काढला. त्यानुसार ११ ऑक्टोंबर रोजीच्या परिपत्रकाला स्थगिती देत पगार दिवाळीपूर्वीच देण्याबाबत सरकारकडून शर्थीचे प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन मेहता यांनी संघटनेला दिले.
Marathi e-Batmya