राज्यातील मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी आज आझाद मैदानावर आपल्या आंदोलनास सुरुवात केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मुंबई पोलिसांनी दिलेली एक दिवसाची मुदत आणखी चार दिवसांची वाढविण्यासंदर्भातील एक पत्र मुंबई पोलिसांना दिल्याची माहिती पुढे आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी आझाद मैदानावर एक दिवसाचे आंदोलन करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारल्यानंतर मुंबई पोलिसांनी दिली. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आतापर्यंतचे आंदोलन पाहिल्यास राज्य सरकारकडूनही कोणतेही ठोस आश्वासन देण्यात येत नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन किमान महिना तरी सुरु रहाते. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून हलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आझाद मैदानावरील आंदोलनाची मुदत वाढविण्यासंदर्भात पत्र दिले आहे.
तर मराठा समाजाच्या आंदोलकांनी मुंबईत येतानाच दैनंदिन जीवनासाठी आवश्यक लागणाऱ्या सर्व वस्तू घेऊन आले आहेत. तसेच पुढील १० ते १५ दिवसाचे धान्य घेऊन आम्ही मुंबईत आलो असून जोपर्यंत आरक्षणाचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत मुंबईतून हलणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आज एका दिवसात मराठा समाजाचं आंदोलन संपुष्टात येईल असे मानने चुकीचे ठरेल असेच सध्या तरी दिसून येत आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील जवळपास १ ते दिडलाख आंदोलक पुण्यापासून मुंबईच्या दिशेने निघाले. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावरील आंदोलकांना मुंबईत प्रवेशाला परवानगी नसल्याने पोलिसांनी निम्म्याहून अधिक जणांना पनवेल येथेच थांबवून ठेवले. त्यामुळे पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची कोंडी झाल्याचे पाह्यला मिळाले.
Marathi e-Batmya