केंद्रीय मंत्री डॉ विरेंद्र कुमार यांची मुंबई विद्यापाठातील डॉ आंबेडकर अध्यासनातील पदांना मान्यता दोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासही मान्यता

मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाणार आहे. तसेच कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी मुंबई विद्यापीठात केली.

मुंबई विद्यापीठात आयोजित संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मुंबई विद्यापीठात नव्याने स्थापन होणारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, प्रा. मनिषा करणे, अनिल कुमार पाटील, प्रभात कुमार सिंह यांच्यासह विविध मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले, संविधान अमृत महोत्सव हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संविधान  जगण्याची चौकट आणि समानतेचं प्रतीक – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याचे मोठे अमूल्य कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. संविधान ही जीवन जगण्याची चौकट आहे. भारतीय संविधान बदलले जात असल्याचा चुकीचा प्रचार केला जात आहे. महिलांना विधानसभा व लोकसभेत ३३ टक्के आरक्षण, सर्वाना मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना आर्थिक निकषांवर नोकरीत आरक्षण अशा तरतुदी करण्यात आल्या. भारतीय संविधान हा एक जिवंत दस्तऐवज असून तो वाचून समजून घेणे महत्वाचे आहे. आपल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव संविधानामुळे होत असून सामाजिक, आर्थिक जीवन जगण्याचा मार्ग संविधानामुळे मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला त्याबद्दल आपण सदैव त्यांच्या ऋणात राहू, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर, दोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जाहीर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांचे आभार मानले. विद्यापीठामार्फत लवकरच या अनुषंगाने प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे सांगून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचेही प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादव यांनी आपल्या उदबोधनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

About Editor

Check Also

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *