सचिन सावंत यांचा सवाल, शेलार व फडणवीसजी, मुंबईला दुसरे वित्तीय केंद्र आणण्याचे काय झाले? केंद्र सरकारसाठी फक्त गुजरातच ‘लाडके राज्य’, नरेंद्र मोदींच्या आदेशाला शिंदे व फडणवीसांची साथ

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण मागील १० वर्षांपासून केंद्र सरकारसाठी एकमेव लाडके राज्य गुजरात आहे. मोदी शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला पळवले व त्याला शिंदे, फडणवीस या नेत्यांनी साथ दिली. शिंदे, फडणवीसांनी गुजरातसाठी काम करून महाराष्ट्राचे हित उद्धवस्त करण्याचे पातक केले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या टाटा एअर बस प्रकल्पाचे उद्घाटन गुजरातमध्ये करून मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा घणाघाती हल्ला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सचिन सावंत बोलत होते. सचिन सावंत म्हणाले की, महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण मोठे असताना महाराष्ट्रातील गुंतवणूक दुसऱ्या राज्यात जाऊ देणे हे लाजिरवाणे आहे. बेरोजगारीमुळे तरुणांच्या आत्महत्या वाढल्या असून १७६४ तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. टाटा एअरबस हा १.८ लाख कोटींचा प्रकल्प होता. सेमी कंडक्टरचा १.५४ लाख कोटी रुपयांचा १ लाख रोजगार देणारा उदयोगही पळवला. हिरे उद्योग गुजरातला घेऊन गेले पण त्यात त्यांना यश आले नाही. नरेंद्र मोदींचा आदेश येताच राज्यातील नेते गुजरातसाठी काम करतात. राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने महाराष्ट्राच्या तरुणांवर अन्याय झाला पण भाजपा युतीचे नेते मात्र मौन बाळगून गप्प बसले आहेत. देवेंद्र फडणवीस हे सातत्याने इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतात आणि राज्यात येणारी गुंतवणूक मात्र इतर राज्यात जाते, याची युतीच्या नेत्यांना लाज वाटायला पाहिजे असा खोचक टीकाही यावेळी केली.

सचिन सावंत पुढे बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदी व भाजपामुळे याआधी मुंबईत होणारे १.६ लाख कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातच्या गिफ्टसिटीला पळवले. मुंबई या आर्थिक राजधानीमध्ये आंतराष्ट्रीय वित्तीय केंद्र होणे अपेक्षित होते, युपीए सरकार असताना तसा प्रयत्न झाला पण २०१४ नंतर मोदी सरकारने त्यात बदल करून तो गुजरातला पळवला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे आशिष शेलार यांनी अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेऊन दुसरे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत होणार असे सांगितले होते, त्याचे काय झाले, याचे उत्तर फडणवीस व शेलारांनी द्यावे अशी मागही यावेळी केली.

काँग्रेसच्या राष्ट्रीय मिडिया समन्वयक आणि मुंबईतील मीडिया प्रभारी चयनिका उनियाल यावेळी यांनीही भाजपा सरकारवर तोफ डागली, त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आतापर्यंत महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटींची गुंतवणूक व ५ लाख रोजगार महाराष्ट्रातून पळवून नेले आहेत. नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थान विरुद्ध गुजरात असे चित्र निर्माण केले आहे, पण गुजरात म्हणजे संपूर्ण भारत नाही. सर्व महत्वाचे प्रकल्प जर गुजरातला घेऊन गेले तर इतर राज्यांचे काय होणार, असा सवाल करत महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा गुजरातला का पळवला, याचे उत्तर महाराष्ट्रातील जनता मतदानातून देईल असा इशाराही यावेळी दिला.

या पत्रकार परिषदेत बेरोजगारीसंदर्भात काँग्रेस पक्षाची जाहीरातही प्रसिद्ध करण्यात आली.

About Editor

Check Also

श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांची अलोट गर्दी ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’च्या जयघोषात भाविकांनी घेतले पावन दर्शन

‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *