रमाबाई नगर, कामराज नगर, शांतीसागर वसाहत झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर, शांतीसागर पोलीस वसाहत आणि कामराज नगर येथील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी आज मंत्रालयात सांगितले.
ते आज घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर, शांतीसागर पोलीस वसाहत आणि कामराज नगर झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. महेता म्हणाले, रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी जवळपास १५५ एकरावर उभी आहे. कित्येक वर्षापासून या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. सन २००७ मध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. तेव्हा टाऊनशीपच्या माध्यमातून विकास करु, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर या पुनर्विकासाला स्थगिती दिली. आता ही स्थगिती उठविण्यात आली असून टाऊनशीपच्या माध्यमातून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सुरु असलेल्या योजनांची सद्यस्थिती त्यातील अडचणीबाबत विकासकांशी चर्चा करुन सध्याची सुरु असलेली व प्रस्तावित योजना टाऊनशीप, स्पेशल प्रोजेक्ट, म्हणून करण्यासंबंधीची माहिती अहवालात नमूद करावी तसेच आर्थिकरित्या शासनाची गुंतवणूक करुन योजना पुढे कशी नेता येईल, या संबंधी एका महिन्याच्या आत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने शासनास अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी महेता यांनी अधिकाऱ्यांना दिले. विभागाच्या अभिप्रायासह अहवाल सादर झाल्यावर मुख्यमंत्र्यांना सादर करुन पूर्ण रमाबाई नगर, कामराज नगर एकत्रित विकासाचा अंतिम निर्णय घेऊ, असेही महेता यांनी सांगितले.
यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीवकुमार, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मिटकर व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मेट्रो- ४ च्या स्लॅब दुर्घटनेप्रकरणी कारवाई कधी करणार अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रावर अद्याप कारवाई नाही

मेट्रो ४ चा मुलुंड भागातील स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *