भाजपा पुरस्कृत माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सुरुवातीला केतकी चितळे हिचा अभिमान वाटतो असे जोरदार वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. मात्र काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनात घुसून खोत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. त्यानंतर मात्र त्यांनी सारवा सारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून आले.
हा प्रकार सोलापूरातील गेस्ट हाऊस येथे घडला. मात्र अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे सदाभाऊ खोत हे गांगरूण गेल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना खोलीबाहेर काढल्यानंतर त्यांनी चितळेने केलेल्या पोस्टचे आपण समर्थन करत नसून तिने वकील न देता स्वत:ची बाजू स्वत:च न्यायालयात मांडली त्यामुळे आपण तिचा अभिमान वाटतो असे सांगत सारवा सारव केली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या केतकी चितळे हिचा अभिमानच वाटतो, असे वादग्रस्त विधान रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले होते. शासकीय विश्रामगृहात खोत हे सोमवारी दुपारी आले असता त्यांच्या दालनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातात टाळ मृदुंग घेऊन थेट प्रवेश केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बाबर, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, सुहास कदम यांच्या नेतृत्वाखाली ५० कार्यकर्ते थेट दालनात घुसले आणि सदाभाऊ खोत यांना पांडुरंगाने सद्बुध्दी द्यावी म्हणून प्रार्थनावजा घोषणा देऊ लागले. नंतर या कार्यकर्त्यांनी खोत यांना जाब विचारत गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यावेळी खोत हे एकटेच खुर्चीवर शांतपणे बसून या रोषाला सामारे जात होते.
तथापि, हा गोंधळ सुरू असताना अखेर तेथे धावून आलेल्या पोलिसांनी राष्ट्रवादीच्या आंदोलक कार्यकर्त्यांना दालनातून बाहेर काढले. वातावरण शांत झाल्यानंतर खोत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केतकी चितळेच्या विधानाचे नाही तर तिने न्यायालयात कोणत्याही वकिलाची मदत न घेता स्वतः आपली बाजू मांडल्याचे आपणांस कौतुक वाटले आणि तिचा अभिमानही वाटला, असा खुलासेवजा दावा केला. चितळे हिने पवारांवर काही बोलले तर तो गुन्हा ठरतो आणि राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाविषयी बेताल विधान केले की तो गुन्हा कसा ठरत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच चितळे हिची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिच्या पोस्टच्या खाली ज्या कार्यकर्त्यांनी अश्लिल मेसेज लिहिले त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर पोलिसांनी गुन्हे नोंदवू नयेत असे माझे मत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya