आदित्य ठाकरेंचा सवाल, ते ४० गद्दार सांगू शकतात का? राज्यातील जनतेला बंडखोरी आवडलेली नाही

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर असून बंडखोर शिंदे गटावर टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात वातावरण इतकं पेटलं आहे जर आजच निवडणूक झाली तर निकालानंतर एकच रंग दिसेल तो म्हणजे भगवा भगवा आणि भगवा. आता काही लोक विचारतील की भगवा रंग कुणाचा? कुठल्या गटाचा? तर त्यांना मी सांगू इच्छितो की भगवा रंग एकच शिवसेनेचा. शिवसेना एकच आहे असे ठाम प्रतिपादन केले.

यावेळी पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, एवढंच नाही महाविकास आघाडीसोबत सगळा महाराष्ट्र उभा आहे हे महाराष्ट्राने नुकतंच पदवीधर निवडणुकीत पाहिलं आहे. मी गेले सहा महिने सांगतो आहे की आज निवडणुका घ्या बघू कोण जिंकतं असे सांगत शिंदे गटावर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात जे वातावरण मी पाहतो आहे की गद्दारी जी झाली आहे ती कुणालाही पटलेली नाही. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे लोकांसोबत जाऊन उभा राहिलो तिथे मी सांगितलं की मी ठाम पणे उभा आहे. पाठीत खंजीर खुपसला नाही. असं ते ४० गद्दार सांगू शकतात का? असाही सवाल केला.

आधी सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले मग गोव्याला गेले मग महाराष्ट्रात आले आज ते सांगू शकतात की आम्ही ५० खोक्यांना हात लावला नाही. आठ महिने झाले ही घोषणा लोक विसरलेलं नाही. एकही व्यक्ती अजून बोलला नाही मी खोक्यांना हात लावला नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

आपल्या राज्यकर्त्यांनी खोक्यांसाठी स्वतःला विकलं आहे. खरंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या लोकांना आनंद व्हायला हवा होता. जेव्हा त्यांच्या पाठीत खंजीर खुपसत होतात याचं त्यांना काहीच वाटलं नाही? हे लोकं डरपोकसारखे सुरतला पळाले. मी तुमच्यासोबत राहणार आहे, इथेच राहणार आहे कारण माझी ताकद तुम्ही सगळे आहात असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आपल्या सभांना लोक स्वतःहून येत आहेत आणि भेटून सांगत आहेत की शिवसेनेसोबत आहे.

मला आज काही लोकांनी भेटून सांगितलं की आम्ही कधी शिवसेनेचे मतदार नव्हतो पण आम्ही आता शिवसेनेचे मतदार झालो आहोत. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे काम केलं त्याचे आम्ही फॅन झालो आहोत असं लोक सांगत आहेत. याचं महत्त्वाचं कारण अत्यंत गलिच्छ राजकारण जे महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं ते आत्ता पाहण्यास मिळणार आहे. या गद्दारांना आपल्याला पळवून लावायचं आहे हे कुणी विसरू नका असे आवाहनही आदित्य ठाकरेंनी केले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *