Breaking News

एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना हायजॅक? नवी कार्यकारीणी जाहिर उध्दव ठाकरे यांना धक्का

मागील १५ ते २० दिवसापासून शिवसेनेतील आमदार, त्यानंतर जुने कार्यकर्त्ये, माजी नगरसेवक यांच्यानंतर आता खासदारांना सहभागी करून घेण्यासाठी अंतिम प्रयत्नात असलेल्या एकनाथ शिंदे गटाने आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय कार्यकारीणी रद्द करत नवी कार्यकारीणी जाहिर केली. विशेष म्हणजे या नव्या राष्ट्रीय कार्यकारीणीत शिवसेना पक्षप्रमुख पदावर उध्दव ठाकरे यांना कायम ठेवण्यात आले आहे. मात्र प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव शिंदे गटाकडून निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना नामधारी पक्षप्रमुख म्हणून नियुक्त करत आणखी एक मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहेत.

शिंदे गटाकडून घोषित करण्यात आलेल्या या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना मुख्यनेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर दिपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तसेच तानाजी सावंत, विजय नहाटा, यशवंद जाधव, गुलाबराव पाटील यांची शिवसेना उपनेते म्हणून तर आज शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांचे नाव कायम ठेवण्यात आले आहे. तसा कोणताही प्रस्ताव नव्हता, असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे.

आता एकनाथ शिंदे गटाकडून ही नवी राष्ट्रीय कार्यकारीणी जाहिर केल्याने या कार्यकारणीत उध्दव ठाकरे हे नामधारी पक्षप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तर मुख्यनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची वर्णी लावण्यात आल्याने शिवसेनेचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकप्रकारे स्वत:कडे घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र ही सगळी खटाटोप सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या विरोधात निर्णय गेला तर निवडणूक आयोगासमोर आपलीच शिवसेना खरी असल्याचे दाखविण्यासाठी शिंदे गटाकडून ही खेळी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, ज्या गतीने एकनाथ शिंदे यांच्या गटात आधी आमदार, नंतर नगरसेवक, माजी खासदार, आमदार आणि आता आजी खासदारांनाही सहभागी करून घेण्यात येत आहे. तसेच त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे पक्षात फूट झाली असे दाखविण्याऐवजी मुळ पक्षच आपल्या सोबत असल्याचे दाखविण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न करण्यात येत असून मुळ पक्ष ताब्यात घ्यायचा अशी रणनीती आखल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत