वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी ‘एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित पेंच वन्यजीव क्षेत्रातील ४० ठिकाणचे अलर्टस्‍ मिळणार

रामटेक तालुक्यातील देवलापार हे आदिवासी बहुलक्षेत्र आणि विशेषतः पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पंचक्रोशित असलेले गाव. याच्या शेजारी पिपरिया नावाचे छोटेसे गाव. वाघांच्या डरकाळ्या व संचार या गावात तसा नवा नाही. वेळोवेळी पाळीव प्राण्यांसह या गावात माणसांवरही जीवघेणे हल्ले झाले आहेत. यातून माणसाच्या जीवांना वाचविण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस व वन विभागाने अभिनव उपाययोजनांवर विचार सुरु केला. यातून एआय आधारित प्रकल्पाने आकार घेतला. याची फलश्रुती म्हणून तीन ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित होऊन संवेदनशील ठिकाणांवर गावकऱ्यांना वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचे सतर्कतेचे इशारे मिळू लागले आहेत. गुरुवारी रात्री या यंत्रणेकडून देवलापारजवळील पिपरिया येथे वाघाचा वावर असल्याचा इशारा गावकऱ्यांना आणि वन विभागाला मिळाला आणि गावकरी सतर्क झाले.

विशेष म्हणजे येत्या १५ एप्रिलपर्यंत वनविभागाचे पेंच वन्यजीव क्षेत्र तसेच प्रादेशिक क्षेत्र मिळून संवेदनशील स्वरुपाच्या ४० गावांमध्ये ही यंत्रणा स्थापित होऊन कार्यान्वित होणार आहे.

नागपूर ग्रामीण भागात मागील अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत वाघ किंवा बिबट्याच्या हल्ल्यात गावकऱ्यांचा मृत्यू होण्याच्या १५ घटना घडल्या आहेत. यापैकी अनेक घटनांमध्ये गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून वन विभाग आणि नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘एआय’ आधारित (कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित) उपाययोजना सुरु केल्या आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात योगदान देणाऱ्या मार्व्हल या संस्थेच्या वतीने ‘एआय’ आधारित यंत्रणा उभारण्यात येत आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे मार्व्हल संस्थेचे सीईओ देखील आहेत. पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी सांगितले की, मागील दोन ते तीन वर्षात घडलेल्या घटनांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. त्यावर उपाय म्हणून आम्ही ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. गावाच्या परिसरात वाघ, बिबटे, अस्वल या सारख्या आक्रमक प्राण्यांचा परिसरात वावर असल्यास सतर्कतेचा इशारा देणाऱ्या ‘एआय’ तंत्रज्ञानावर मार्व्हलने काम केले. त्याअंतर्गत विशिष्ट ठिकाणांवर उच्च क्षमतेचे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे तंत्रज्ञान ‘बायो अॅक्यूस्टिक्स’ (ध्वनी आधारित) आणि ‘बायो व्हिज्युअल’ (प्रत्यक्ष दृष्य आधारित) अशा दोन प्रकारे काम करते. वाघ किंवा बिबटे परिसरात आल्यास चितळ, सांबर, माकड यासारखे तृणभक्षी प्राणी आणि मोर विशिष्ट प्रकारचे आवाज काढून संपूर्ण परिसराला सतर्क करतात. ते विशिष्ट आवाज टिपून हे ‘एआय’ तंत्रज्ञान डेटाचे विश्लेषण करुन त्यासंबंधीचे सतर्कतेचे इशारे संबंधितांना पाठविण्याचे कार्य करते. सतर्कतेचे इशारे वन विभागाचे अधिकारी व गावकऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर मिळू शकतात. याशिवाय ‘बायो व्हिज्युअल’ प्रकारच्या तंत्राच्या माध्यमातून कॅमेरात प्रत्यक्ष प्राण्याचे फोटो ‘कॅप्चर’ झाल्यास हे तंत्रज्ञान सतर्कतेचे इशारे पाठवते.

पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी सांगितले की, वन विभागाच्या मदतीने आम्ही वन्यप्राण्याच्या हल्ल्यांच्या दृष्टीने संवेदनशील अशा ४० ठिकाणांची निवड केली असून तेथे प्राधान्याने कॅमेरे लावण्यात आले आहेत. याच आठवड्यात तब्बल तीन ठिकाणी ही यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वितही झाली असून मागील चार दिवसात दोनदा वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचा सतर्कतेचा इशारा वन विभाग आणि ग्रामस्थांना देण्यात आला आहे. वन विभागाच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश असलेल्या वन्यजीव क्षेत्रासह प्रादेशिक विभागातही खापा व पारशिवनी परिसरात ही यंत्रणा कार्यान्वित होत आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातही ही यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव असून यासंदर्भात वन विभागाचा मार्व्हल संस्थेशी सामंजस्य करार झाला असल्याचे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, एलपीजी दरवाढ तात्काळ रद्द करा, गॅस धोरण संसदेत जाहीर करा १५०० रुपये देण्याचा ढोल पिटणाऱ्या सत्तेतील सावत्र भावांकडून गॅस महाग करून लाडक्या बहिणींची लूट.

एलपीजी गॅस ६० रुपयांनी महाग करून भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *