अजित पवार म्हणाले, १४ ला होऊ शकतो, तर देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, बर झालं… मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवरून अद्यापही अनिश्चितता

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास २० होत आले. तर राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी पार पडून सात दिवस झाले. तरीही राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्ताराचा काही मुहुर्त लागताना दिसून येत नाही. त्यामुळे विविध तर्क वितर्कांना उधाण आले असतानाच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून परस्पर विरोधी विधाने करण्यात आल्याने राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तर दुसऱ्याबाजूला शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कालपासून दिल्लीत मुक्कामी असताना मात्र ते या चर्चांच्या भानगडीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या म्हणीनुसार तीन तिघाडा काम बिगाडा अशी स्थिती तर झाली नाही ना असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा त्यांचे काका शरद पवार यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी अजित पवार हे त्यांच्या कुटुंब कबिल्यासह त्यांच्या पक्षातील नेत्यांना सोबत घेत शरद पवार यांच्या घरी गेले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना प्रश्न विचारत विधानसभेचे अधिवेशन जवळ आले आहे त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असे विचारले असता ते म्हणाले की, १४ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षाच्या आमदारांचा शपथविधी होणार असल्याचेही यावेळी सांगितले.

त्यानंतर सध्या दिल्ली मुक्कामीच असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बरं झालं तुम्हीच मला राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या शपथविधीची तारीख सांगितली अशी खोचक टीपण्णी करत अजित पवार यांच्या वक्तव्यावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार शपथविधीच्या तारखेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान तसेच भाजपाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना विठ्ठल रूख्मिणीची मुर्ती भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्वारूढ शिवरायांची मुर्ती, अमित शाह यांना वीर सावरकरांची मुर्ती तर गाय वासराची मुर्ती जे पी. नड्डा यांना तर नितिन गडकरी आणि राजनाथ सिंह यांना सिद्धिविनायकाची मुर्ती भेट दिली. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. परंतु आमच्या पक्षाची यादी तयार असल्याचा दावा केला.

सूत्रांच्या माहिती नूसार अमित शाह, जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे भाजपा २० – २१, शिंदे- शिवसेना १२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे मिळू शकतात. मात्र याबाबत अंतिम घोषणा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर खातेवाटप कसे होणार याची अधिक उत्सुकताही सर्वांना लागली आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले सरकारकडे पैसे नसताना ८८ हजार कोटी रुपयांच्या महामार्गाची गरजच काय?

अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *