Breaking News

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, प्रचाराचे दौरे सुरु करणार असल्याने श्री सिध्दीविनायकाचे दर्शन महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने त्याची सुरुवात म्हणून आज माझ्या सर्व मंत्री आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमवेत श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सोमवारी पक्षाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर आज सकाळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री व पदाधिकारी पक्ष कार्यालयात एकत्र जमून बसने श्री सिध्दीविनायकाच्या दर्शनाला दाखल झाले.

यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही जनतेसमोर त्यांचे आशिर्वाद मागण्यासाठी जात आहोत. सिध्दीविनायकाने आम्हाला आशिर्वाद द्यावेत त्यासाठी विजयाची खूण दाखवली आहे. शेवटी जनता – जनार्दन सर्वकाही असते. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत असेही सांगितले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि आज अंगारकी असल्याने माझ्या पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांना घेऊन दर्शनाला आलो आहे. १४ जुलै रोजी बारामतीमध्ये आमची जाहीर सभा होत असल्याने त्याची सुरुवात आज केल्याचे यावेळी सांगितले.

सिध्दीविनायक दर्शन वारीसाठी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील,अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, महिला नेत्या सुरेखाताई ठाकरे, पक्षाचे आमदार, माजी आमदार, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर, विश्वस्त सुनिल गिरी, आरती साळवी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, सिध्दीविनायक मंदीरात दर्शनासाठी चमूला घेऊन अजित पवार यांनी विधिवत सिध्दीविनायकाची पूजा केली. तसेच होम हवनचे आयोजन अजित पवार यांच्या पूजेसाठी करण्यात आल्याचेही दिसून आले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *