राज्यातील शिवसेनेचा दसरा मेळावा, मनसेचा गुढी पाडवा मेळावा तर पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा आदी गोष्टी दरवर्षी सातत्याने आयोजित करण्यात येतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याकडून मागील अनेक वर्षापासून दिवाळी पाडव्याच्या दिवशी संपूर्ण पवार कुटुंबिय बारामतीकरांसह राज्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यातच यंदा विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आणि शरद पवार यांच्यापासून राजकिय दृष्ट्या विभक्त झालेल्या अजित पवार यांनी यावर्षी पहिल्यांदाच काटेवाडी येथे स्वतंत्र दिवाळी पाडवा कार्यक्रमाचे आयोजन केले. तरीही अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांनी शरद पवार यांना भेटून त्यांचे आशिर्वाद घेतले.
याबाबत अजित पवार यांना विचारले असता म्हणाले की, गोविंद बागेत दरवर्षी दिवाळी पाडवा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या कार्यक्रमाला काही जण मला भेटायला येत असतात तर काही जण साहेबांना (शरद पवार) यांना भेटायला येत असतात. त्यामुळे तेथे एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा होते. त्यामुळे नागरिकांना ताटकळत बसायला लागू नये यासाठी दिवाळी पाडवा कार्यक्रमाची विभागणी करण्यात आली असल्याचा खुलासा केला.
दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अजित पवार बोलत होते. त्यावेळी अजित पवार यांनी वरील माहिती दिली.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जे मला भेटायला येणारे आहेत ते इकडे येथील आणि जे साहेबांना भेटायला जाणारे आहेत. ते तिकडे जातील. त्यामुळे नागरिकांना वेळेत भेटून त्यांना पुन्हा आपापल्या घरीही जाता येईल. नागरिकांना ताटकळत बसायला लागू नये म्हणूनच ही विभागणी केल्याचे यावेळी सांगत पुढे बोलताना म्हणाले की, मला भेटायला आलेले नागरिकांमध्ये तरूण होते, प्रौढ होते, वयोवृद्धही होते. त्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्याही स्विकारल्याचे सांगितले.
अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले की, पूर्वी दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम इथे काटेवाडीतच होत होता. त्यावेळी आमचे सर्व वडीलधारी माणसं होती. मात्र साहेबांनी गोविंद बागेत जमिन घेतली. त्यानंतर तेथे दिवाळी पाडवा घेण्यात येवू लागला. वास्तविक तेथे दिवाळी पाडवा घेण्यामागे ती जागा बारामतीकरांना आणि इतर गावकऱ्यांना जवळची आहे. त्यामुळे तेथे सर्वजण जात असल्याचेही यावेळी सांगितले.
दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला आलेल्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी मागणी करत होते. त्यावर अजित पवार म्हणाले की, आता आम्ही महायुतीत मुख्यमंत्री पदाबाबत असे काही ठरंल नाही. त्यामुळे निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर त्याबाबतचा निर्णय होईल. पण आम्ही तिघ-चौघांनी महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडणूक आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आम्ही निवडणूक कामाला लागल्याचेही यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीबाबत विचारता अजित पवार म्हणाले की, दिवाळी पाडवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही असे काही महत्वाचं नसतं. त्यामुळे उद्या मी मुंबईत पोहोचलो की, आम्ही बसून महायुतीच्या बंडखोर उमेदवारांबाबत निर्णय घेऊ. तसेच उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा वेळ आहे. त्यानंतर कोण राहतं कोण मागे घेतं त्याबाबत बघू असेही यावेळी सांगितले.
यावेळी शरद पवार यांनी सत्ताधारी महायुतीकडून त्यांच्या उमेदवारांना पोलिस गाड्यामधून रसद पोहोचवली जात असल्याचा आरोप केल्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कोणाचीही गाडी तपासण्याचा अधिकार आहे. त्यांना वाटल्यास ते माझीही गाडी तपासतील, तुमचीही गाडी तपासतील. त्यामुळे त्या गोष्टीला काही अर्थ नाही असे सांगत शरद पवार यांच्या आरोपावर बोलताना सांगितले.
तसेच यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, काल सुट्टीचा दिवस असल्याने मी काही गावांचाच दौरा केला. मात्र मी इथे उमेदवार असल्याने स्थानिकांना मतदारांना भेटणे माझं कर्तव्य होतं असेही यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले की, जर मला ब्लॅकमेल केलं असतं तर मी १० वर्षे थांबलो असतो का आधीच भाजपासोबत गेलो असतो असे सांगत त्या आरोपात काही तथ्य नसल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya