अजित पवार यांनी घेतला ‘सारथी’सह अ. पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामाचा आढावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, यावर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावा अजित पवार यांनी घेतला.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, नियोजन विभागाचे सहसचिव विवेक गायकवाड यांच्यासह दूरदृश्य प्रणालीव्दारे सहकार आयुक्त दीपक तावरे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ राजेश देशमुख, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख, महाराष्ट्र बँकेचे महाव्यवस्थापक अरुण कबाडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे,  सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा. या योजनांची माहिती गरजूंपर्यंत योग्य प्रकारे पोहोचविणे ही महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगून, योजनांचा प्रचार-प्रसार प्रभावीपणे करण्याच्या सूचनाही दिल्या.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये तसेच योग्य लाभार्थ्यांची निवड करून त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी यासाठी यंत्रणांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले की, महामंडळाच्या योजनांमुळे तरुणांना व्यवसाय, उद्योग व उद्यमशीलतेसाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे राज्यात स्वयंरोजगाराच्या संधी वाढीस लागून आर्थिक प्रगतीला चालना मिळते. त्यामुळे या योजना अधिक प्रभावीपणे राबवून त्याचे परिणाम समाजाच्या तळागाळापर्यंत दिसून यावेत, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करण्याच्या सूचना देतानाच यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावा घेतला. ‘सारथी’ मार्फत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, संशोधन, स्वाधार योजना, परदेशी शिष्यवृत्ती योजना व वसतिगृह यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्य विकास व प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे. तसेच मुलांच्या शिक्षण व प्रगतीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *