Breaking News

अजित पवार यांचा इशारा,… किंमती वाढतात, नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावा ‘पीएमयू’च्या विकासप्रकल्पांचा घेतला आढावा

राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच पुणे शहरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून सर्व विभागांनी योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन आणि बंदरे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक तीनच्या कामाला गती द्या. तसेच हडपसर ते लोणीकाळभोर, हडपसर ते सासवड, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली या वाढीव मेट्रो मार्गांच्या परवानगीसाठी केंद्रसरकारकडे पाठपुरावा करा. नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंगरोडचे काम वेगाने मार्गी लावा. त्याचबरोबर पुणे शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. पुणे शहरात दरवर्षी लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि उपनगरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसेच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करावी.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, सैनिक स्कुल, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, पुणे बाह्यवळण रस्ता, वडाळा येथील जीएसटी भवन, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *