साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष ऑगस्ट २०१९ पासून सुरु होणार आहे. या शताब्दी वर्षामध्ये विविध सामाजिक कार्यक्रम व उपक्रम आयोजन करण्याबाबत अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केली.

*साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती महोत्सव व विविध कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनामार्फत विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. यासाठी अण्णा भाऊ साठे जन्म शताब्दी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीद्वारे भारत-रशिया यांच्या सांस्कृतिक मंडळातर्फे रशिया येथे साहित्यविषयक कार्यक्रम आयोजित करणे, वाटेगाव ता.वाळवा, जि.सांगली येथे अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारणे, अण्णा भाऊ साठे यांच्या ग्रंथ चित्ररथाचे महाराष्ट्रभर प्रदर्शन करणे, जन्मशताब्दी गौरव ग्रंथ प्रकाशित करणे, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित चर्चासत्र व परिसंवाद आयोजित करणे, मातंग समाजातील १०० तरुण उद्योजकांना एमआयडीसीमध्ये भूखंड उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मातंग समाजातील १०० सामाजिक कार्यकर्ते व कलावंतांना सामाजिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल अण्णा भाऊ साठे विशेष जन्मशताब्दी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू मदत आणि उपचाराला मिळणार गती, आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *