Breaking News

आशिष शेलार यांचा सवाल, काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला उध्दव ठाकरे दिल्लीत आरक्षणासाठी गेले नाहीत तर मला मुख्यमंत्री करा हे सांगायला गेलेत

उध्दव ठाकरे हे दिल्लीला महाराष्ट्राच्या शेतकरी, महिला, तरुण अथवा मराठा आरक्षण या विषयासाठी गेलेले नाहीत तर मला मुख्यमंत्री करा हे काँग्रेसला सांगायला गेलेत. ते दिल्लीत काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत, असा थेट आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात आमदार अॅड आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या उध्दव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला.

अॅड आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला शासकीय बैठकीला अथवा नीती आयोगाच्या बैठकीला गेले. महाराष्ट्राच्या हिताचा निधी आणायला गेले, तर इथे घरी बसून उद्धव ठाकरे टीका करतात की, मुख्यमंत्री दिल्लीला गुडघे टेकायला गेले..दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालायला गेलेत… दिल्लीला नतमस्तक व्हायला गेलेत.. दिल्लीश्वरांच्या चरणी माथा टेकवायला गेलेत…सह्याद्री दिल्ली समोर झुकणार नाही… मराठी माणूस दिल्ली समोर वाकणार नाही… ही सगळी वाक्य रचना आणि विधाने करणारे श्रीमान उद्धव ठाकरे आता दिल्लीतील काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत का ? असा सवाल कर किंबहुना आमचा आरोपच आहे की, होय तुम्ही दिल्लीतला काँग्रेसवाल्यांची भांडी घासायलाच गेले आहेत अशी टीकाही यावेळी केली.

आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे दिल्लीत महाराष्ट्राच्या हितासाठी गेलेले नाहीत. दिल्लीत जाऊन महाराष्ट्रातील युवकांना रोजगार आणू, अथवा अतिवृष्टी झाली आमचा शेतकरी मित्र अडचणीत आहे. राज्य शासनाने मदत केली पण अधिकची मदत केंद्राकडे मागू, अशा कुठल्याही विषयावर ना निवेदन, ना कुठली बैठक ना चर्चा. तसेच महिला भगिनींच्या विषयांमध्ये काही बैठक अथवा निवेदन सुध्दा घेऊन ते गेलेले नाहीत असा उपरोधिक टीका केली.
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, त्यांच्या घरासमोर जेव्हा मराठा आरक्षण आंदोलक येऊन बसले तेव्हा ते म्हणाले होते की, मराठा आरक्षणासाठी दिल्लीला निर्णय घेतला पाहिजे. मग का नाही आरक्षणाबाबत एखादे निवेदन घेऊन दिल्लीला गेलात?, असा सवालही यावेळी उपस्थित केला.

आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, उध्दव ठाकरे हे ना आरक्षणाच्या बाजूने ना महाराष्ट्राच्या बाजूने आहेत, ते दिल्लीला गेले तो कटोरा घेऊन गेले आहेत. आणि काँग्रेसच्या दिल्लीश्वरांची भांडी घासायला गेले आहेत. तेही का ? तर मला मुख्यमंत्री पदाची खुर्ची द्या.. मला मुख्यमंत्री बनवा.. मला जास्त जागा द्या… माझ्या पक्षाचा विचार करा … असा कटोरा घेऊन ते दिल्लीत गेलेत अशी टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, त्यांनी दिल्लीत जाऊन बांगलादेशचा मुद्दा काढलाय हिंदूंचा विषय काढला आहे. मुंबईत धारावीमध्ये हिंदू कार्यकर्ता आमचा मारला गेला, खून झाला. हिरव्या पिलावळीने माँब ब्लिचिंग केले. तर उरण मध्ये यशश्री शिंदे या तरुणीचा दाऊद नावाच्या आरोपीने खून केला. तुम्ही घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या धारावीत ही गेला नाहीत आणि उरणला ही गेला नाहीत मग आमच्या नेत्यांना ढाक्याला जायचे सल्ले कसले देताय? असा सवाल करत जेव्हा भाजपाने सीएए कायदा आणला तेव्हा उबाठा आणि काँग्रेसने विरोध केला आणि आज बांगलादेशातील हिंदूंचा कैवार घेत आहेत. मग का त्यावेळी सीएए ला विरोध केला? सीएए ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला सोडा मग हिंदू विषयावर बोला. तुम्ही हिंदू विरोधी आहात, हिंदूंची माफी मागा अशा शब्दांत हल्लाबोल केला.

आघाडी ही फुटीच्या उंबरठ्यावर

शेवटी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, महाविकास आघाडीचे नेते एकमेकांचे फोन घ्यायला तयार नाहीत, महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटप, जागा वाटप तर सोडाच कुठल्या मुद्द्यावर एक वाक्यता दिसत नाही. काँग्रेसचे जे प्रभारी आहेत त्यांना संजय राऊत पत्रकार परिषदेत ओढत होते हळूहळू हे एकमेकांना ठोसे मारु लागतील. त्यामुळे जागा वाटपाच्या वेळीच महाविकास आघाडी फुटणार, असे भाकितही यावेळी केले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *