आशिष शेलार म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी सोबतचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा सामनाच्या अग्रलेखाला भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे उत्तर

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जे अभिवादन करायला तयार नाहीत, अशा काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत तडजोडीचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा नाही का? …असे म्हणत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सामनातील अग्रलेखाला प्रतिउत्तर दिले आहे.

त्यांनी पत्रात म्हटले आहे की, विरोधी पक्षाने नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करायला हवा, अशी “मर्दानी” हाक आज सामनाच्या अग्रलेखातून दिली आणि “कर्नाटकने आरे केले तर आम्ही कारे करु”  हा महाराष्ट्राने दिलेला इशारा यांनी नेभळट ठरवला… वा रे मर्दा..!

मुळात विरोधी पक्षाने नरसिंह अवतार धारण करण्यासाठी, या अवताराला बोलावण्यासाठी एका  “प्रामाणिक” भक्त प्रल्हादाची गरज असते ना हो कार्यकारी संपादक महोदय…! तुमच्याकडे नारायण..नारायण जप करणारा भक्त प्रल्हाद आहे का?  तुमच्याकडे आता भक्त प्रल्हाद ही नाही,  नारायण ही नाही. आणि हो, तुमच्यात आता रामच उरलेला नाही. आठवते का? कधी काळी राम मंदिर आणि राम वर्गणीची खिल्ली उडवली होतीस ना रे मर्दा? आता भक्तप्रल्हाद होऊ पाहताय? वा रे मर्दा!

कर्नाटकला महाराष्ट्र जशास तसे उत्तर देईल..आरेला कारे करेल.. हा इशारा तुम्हाला नेभळट वाटतो काय? मग राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकररांना समलैंगिक म्हणते तेव्हा तुम्ही करता तो काय? मर्दानी बाणा असतो काय? वा रे मर्दा वा!

तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वशंजाकडे पुरावे मागता, तो काय तुमचा मर्दपणा होता का? प्रभू राम झालाच नाही… भगवत गिता जिहाद शिकवते असे महान जावई शोध लावणाऱ्या काँग्रेस सोबत इलूइलू जे तुमचे सुरु आहे, ती मर्दानकी आहे का? अहो महाराष्ट्रातील श्रध्दा वालकर नावाच्या लेकीचे ३५ तुकडे केले जातात तेव्हा जो पक्ष साधी हळहळ सुध्दा व्यक्त करीत नाही ना, त्याला नेभळटपणा म्हणतात… देशाचे तुकडे करायला निघालेल्या पीएफआयवर आमच्या सरकारने बंदी घातल्यानंतर त्याचे साधे समर्थन ही न करणे हे नेभळटपणाचे लक्षण नाही का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय? हा प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला मर्दानकी वाटते काय? वा रे मर्दा..!

काश्मीर मधून ३७० हटवणे, अयोध्येत राम मंदिर बांधणे ही मर्दानी कामे आहेत संपादक महोदय…आम्हाला, होय… होय आम्ही मर्द आहोत..असे होर्डिंग लावावे लागत नाही… भाजपाने करुन दाखवलेय… मनगटात ज्यांच्या जोर असतो तेच मर्दानकी करु शकतात.

उरला प्रश्न वंदनीय शेलारमामांचा…अहो तुमचे फुसके कर्तृत्व सिध्द करायला तुम्ही काय करताय? छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत पराक्रमी मावळे अशी ओळख असलेल्या शेलारमांमाना तुम्ही नेभळट म्हणताय की काय? वा रे मर्दा!

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना केवळ डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *