मुंबईः प्रतिनिधी
कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यावर पक्षाने सोपविलेली जबाबदारी मी पार पाडत आहे. तसेच सभागृहातील कामकाजाबद्दलची माहिती मी सविस्तरपणे माझ्या “वर्षपूर्तीचा लेखाजोगा” या पुस्तकात दिलेला आहे. त्याची प्रत कार्यक्रमानंतर तुमच्या प्रयत्न लगेच पोहोचविणार असून लेखाजोगा पाह्यल्यानंतर तुम्हाला पुन्हा खंत वाटणार नाही असा विश्वास विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शरद पवारांना खुले पत्र लिहीत दिला आहे.
मुंबईत संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चा पार पडल्यानंतर या मोर्चात भेंडीबाजारच्या महिला कशा ? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या या वक्तव्याने आपण व्यथित झालो असून ते पद मी भुषविल्याने त्याबद्दल खंत वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्यास उत्तर देताना दरेकर म्हणाले की, पदाची जबाबदारी स्विकारल्यापासून कोविडच्या काळात आपण राज्य सरकारच्या खांद्याला खांदा लावून लढलो. तसेच सरकारला अडथळा होईल असे कोणतेही राजकारण करणार नसल्याचा शब्द दिला. त्याचबरोबर राज्यातील अन्यायग्रस्त महिलांना प्रत्यक्ष भेटून धीर दिला. शिवाय घटनास्थळी जावून प्रत्यक्ष घटनेच्या अनुषंगाने माहिती राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली. तसेच विधान परिषद सभागृहात कामकाजात सहभागी होतानाही मानहानीकारक किंवा वैयक्तीक पातळीवर उतरून गोष्ट केली नाही. त्या कामकाजाची सविस्तर माहिती माझ्या वर्षपुर्तीचा लेखाजोगा या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेला देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी स्वतःचे गुणगान गाणार नसून आपण ते पुस्तक पाह्यल्यास आपणाला खंत वाटणार नसल्याचे सांगत शरद पवारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला.



Marathi e-Batmya