पै चंद्रहार पाटील यांचा इशारा, अन्यथा आझाद मैदानात उपोषण राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली पाहिजे

१९६० पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही राज्यातील सर्वोच्च मानाची एकमेव स्पर्धा म्हणून घेतली जात होती. मात्र अलीकडे संघटनांमधील मतभेद, श्रेयवाद आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वर्षभरात तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असून त्यामुळे कुस्तीगीरांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. “महाराष्ट्र केसरी किताबाची किंमत घटते आहे”, अशी खंत व्यक्त करत राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकच झाली पाहिजे अशी मागणी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी करत अन्यथा मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला.

पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले, दरवर्षी महाराष्ट्र केसरी किताबासाठी एकच स्पर्धा व्हावी हीच मागणी आहे. अनेक स्पर्धा झाल्यामुळे खरा महाराष्ट्र केसरी कोण हेच लोकांना समजेनासं झालं आहे. त्यामुळे या किताबाची किंमत कमी होत आहे.”
गेल्या वर्षी निवडणुका असल्याने २०२४ मधील स्पर्धा पुढे ढकलली. परिणामी २०२५ मध्ये दोन स्पर्धा झाल्या आणि नोव्हेंबरमध्ये पुन्हा दोन स्पर्धा होणार आहेत. आता आणखी एक संघटना उदयास आल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत एका वर्षात चार ते पाच महाराष्ट्र केसरी निर्माण होणार असल्याचे सांगितले.

शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा उपोषण

पुढे बोलताना पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले की, प्रत्येक महाराष्ट्र केसरीला शासनाकडून पेन्शन व अन्नसुविधा दिल्या जातात. मग एका वर्षाला अनेक महाराष्ट्र केसरी असतील तर शासन कोणाला खरा महाराष्ट्र केसरी मानणार? ही जबाबदारी शासनाची आहे. लवकर निर्णय न घेतल्यास आम्ही आझाद मैदान, मुंबई येथे उपोषणाला बसणार आहोत.

पै. चंद्रहार पाटील यांनी यापूर्वी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले होते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी अशी मागणी केली होती. मात्र ती मागणी अजून मान्य न झाल्याने व तोडगा न निघाल्यामुळे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
शेवटी बोलताना पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले की, आमचा कोणत्याही कुस्तीगीर संघटनेला विरोध नाही, मात्र दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, हीच आमची मागणी असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू मदत आणि उपचाराला मिळणार गती, आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *