चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, राज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल ·योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्र्यांचे कौतुक

महसूल विभाग अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत आहे. मागील काही महिन्यांमध्ये विविध लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. या माध्यमातून होत असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा महसूल विभाग येत्या काळात देशात सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. दिवाळीचा सण साजरा करीत असताना आपत्तीग्रस्तांच्या घरातही आनंदाचा एक दिवा पेटेल यासाठी सामाजिक जाणिवेतून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मागील काही महिन्यात मंत्रालयातील तसेच क्षेत्रीय पातळीवरील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी याचबरोबर जमाबंदी आयुक्त तसेच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयांतर्गत यंत्रणेने सेवा पंधरवडा, वाळू धोरण, पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे, तुकडेबंदी, जिवंत सातबारा, स्थानिक विषय आदींमध्ये प्रचंड काम केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण यंत्रणेचे कौतुक केले. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी यावेळी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सर्वसामान्यांना वाळू तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी वाळू धोरणाचे पालन करून नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व वाळू गटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश दिले. तसेच मदत व पुनर्वसन विभागामार्फत आपत्तीग्रस्तांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या मदतीच्या निधीचे योग्य वितरण करावे. पुढील वर्षात नागरिकांच्या फायद्यासाठी महसूल विभागांतर्गत ज्या नियमांमध्ये, कायद्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, त्या सुचविण्याचे आवाहन यंत्रणेला केले. विभागातील अनेक पदांच्या पदोन्नत्या झाल्या असून येत्या तीन महिन्यात विभागातील उर्वरित पदांच्या पदोन्नत्यांची प्रक्रिया पूर्ण होईल, असेही सांगितले.

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी नागरिकांची वाळूची गरज लक्षात घेऊन सर्व वाळू गटांची निविदा, कार्यादेश आणि लिलाव प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करावी, अशी सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केली. महसूल विभागाची विश्वासार्हता वाढविण्यासाठी शासनाचे आदेश तसेच नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *