ते दोन फोटो शेअर करत सुषमा अंधारे म्हणाल्या, “वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा..” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन वेगवेगळ्या मुंबई दौऱ्यातील फोटो शेअर केले

राज्यातील आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले. तसेच जवळपास ३८ हजार कोटींच्या विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पणही पंतप्रधान मोंदीच्या हस्ते करण्यात आले. मात्र कार्यक्रमातील पंतप्रधान मोदीं आणि मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो आणि पूर्वीचा एक मोदींचा फोटो असे दोन फोटो उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटरवरून शेअर करत मोदी आणि शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

सुषमा अंधारेंनी ट्वीट केलेला पहिला फोटो जुना आहे. यात नरेंद्र मोदी मुंबईत आले तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. तसेच दुसरा फोटो नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यातील आहे. या फोटोत एकनाथ शिंदे मोदींना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत.

सुषमा अंधारे यांनी हे दोन्ही फोटो ट्वीट करताना ‘हाच तो फरक’ म्हणत बाळासाहेब ठाकरे असताना त्याचं राजकीय स्थान आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय स्थान यावरून खोचक टोला लगावला आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागात सभा घेत आहेत. या यात्रेचा समारोप मुंबईत होईल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर बीडमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, समारोपाची मोठी सभा मुंबईला होईल. त्यासाठी उद्धव ठाकरे, राज्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मविआतील सगळे नेते उपस्थित असतील. ठाकरे गटाच्या मोठ्या ८ सभा होतील.

उद्धव ठाकरेंचं पक्षाध्यक्षपदच बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्याचा समाचार घेताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, काही पेड ट्रोलर्स चुकीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण सांगतात की ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख, पक्ष बेकायदेशीर आहेत, मान्यता आम्हालाच मिळणार आहे’, संजय शिरसाटसारखा माणूस असं सांगत असेल तर मग निवडणूक आयोगाने तुमच्या कानात येऊन हे सांगितलंय का? निवडणूक आयोग तुमच्या घरचं आहे का? तुम्ही इतक्या ठामपणे सांगताय, तर मग तुमची आणि आयोगाची साठगाठ झाली आहे का? नसेल झाली, तर तुमच्यावर खटला दाखल करावा का? असा खोचक सवालही अंधारेंनी उपस्थित केला.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *