Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, महाराजांचा नवा पुतळा उभारणार, समितीची स्थापना वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत निर्णय

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम कुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस अॅडमिरल अजय कोचर, रियर अॅडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.

यावेळी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते , तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती पुतळा कोसळण्याची जबाबदारी निश्चित करेल.

छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे. उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही यावेळी सांगितले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *