Breaking News

वादग्रस्त रामगिरी महाराजांची भेट घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आता सलोखा राखण्याचे आवाहन राज्यात कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखा

दोन दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरु महम्मंद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रामगिरी महाराज यांची भेट घेत त्यांच्यासोबत एका कार्यक्रमात एकाच मंचावर उपस्थितही राहिले. तर याच कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी तर मंचावरच रामगिरी महाराजांच्या पाया पडताना अनेकांनी पाहिले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये सामाजिक सलोख्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानंतर उशीराने का होईना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आज आवाहन केले.

बदलेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करत सर्व समाज घटकांना शांतता राखण्याचे आणि आगामी सण व उत्सव एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले, नाशिक शहरातील काही भागांमध्ये काल निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आवाहन केले. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती आटोक्यात आली असली तरी अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे सामाजिक सलोख्याचे राज्य आहे. राज्याच्या या समृद्ध परंपरेला धक्का लावणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. कोणत्याही समाज घटकाने कायदा हातात घेऊ नये. काही समस्या असल्यास त्या संवादाच्या माध्यमातून सोडविण्यात याव्यात. येत्या काळात विविध सण येत असून या सर्व उत्सवांमध्ये सर्व समाजांनी सहभागी होऊन ते आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आपले सण हे आपल्या सांस्कृतिक वैविध्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे प्रत्येक समुदायाने इतरांच्या भावना लक्षात घेऊन आपले सण साजरे करावेत, असे सांगितले.

राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त, अधीक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून कोणतीही अफवा किंवा खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर देखील कडक नजर ठेवली जात असून, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट्सवर त्वरित कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना एकजुटीने राहण्याचे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले आहे

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *