Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा, विधानसभा निवडणुकीत सूज उतरणार उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर साधला निशाणा

विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने सभागृहात चर्चेची तयारी ठेवावी. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलून केवळ हंगामा करण्यापेक्षा विरोधकांनी सभागृहात बोलावे. आम्ही त्याला उत्तर देऊ, असे आव्हान बुधवारी सत्ताधारी पक्षाच्यावतीने विरोधकांना देण्यात आले. सत्ताधरी पक्षावर घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्या विरोधकांचे घोटाळे बाहेर काढण्याचा आणि खोट्या नॅरेटिव्हचा पर्दाफाश करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सत्ताधारी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार घालताना सरकारला पत्र लिहिले. या पत्राच्या माध्यमातून विरोधी पक्षाने सरकारवर विविध आरोप केले आहेत. या आरोपांचा समाचार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या विरोधी पक्षाला क्षणिक आनंद मिळाला. पण १५ वर्षानंतर काँग्रेसला लोकसभेत ९९ जागा मिळाल्या. ४०, ५० आणि ९९ अशा जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला २४० पर्यंत पोहचायला आणखी २५ वर्ष लागतील, अशी बोचरी टीकाही केली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संविधान बदलणार असे खोटे कथानक तयार करून लोकांची दिशाभूल करून मते मिळवली. त्याने क्षणिक आनंद मिळाला. आम्ही उबाठा गटासमोर १३ जागांवर लढलो आणि त्यापैकी सात जागा आम्ही जिंकल्या. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मिळालेले यश ही तात्पुरती सूज आहे आणि ती विधानसभा निवडणुकीत लवकरच उतरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी रेसकोर्सच्या जागेबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेपैकी १२० एकर जागेवर सेंट्रल पार्क तयार करण्यात येणार आहे. मुंबई किनारा मार्गाची १८० एकर आणि रेसकोर्सची १२० एकर अशा एकूण ३०० एकर जागेवर अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क तयार करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विद्यमान सरकारच्या पावसाळी अधिवेशनावर निरोपाचे अधिवेशन अशी खोचक टीका केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, चौदाव्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात निरोप द्यायला सभागृहात येणार कि तो फेसबुक लाईव्ह करून द्याल. निरोप द्यायचा की नाही द्यायचा हे जनता जनार्दनाच्या हातात असते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांना लगावला. पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेईल, अशी ग्वाहीही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत