Breaking News

चित्रा वाघ यांचा आरोप, बदलापूर घटनेवरून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न

बदलापूरमध्ये राज्यासाठी लज्जास्पद घटना घडल्यानंतर महायुती सरकारने तात्काळ पावले उचलली. मात्र महाविकास आघाडीचे नेते या दुर्दैवी घटनेचे राजकारण करून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला.

भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चित्रा वाघ बोलत होत्या. यावेळी भाजपा प्रदेश महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, अर्चना देसाई, भारती चौधरी आदी उपस्थित होते.

चित्रा वाघ पुढे बोलताना म्हणाल्या की, बदलापूर प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा नक्की होणार, महायुती सरकार त्या दिशेने प्रयत्नशील आहे अशी ग्वाही देत माणुसकीला लाजवेल अशा या प्रकरणी तात्काळ एसआयटी नेमली, अकार्यक्षम पोलिसांना बडतर्फ केले, सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक केली, सर्वपक्षीय मंडळी विश्वस्त मंडळावर असलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेची चौकशी सुरु केली, नराधमाला अटक केली. महायुती सरकारने शक्य ते सर्व तातडीने केले. याप्रकरणात एफआयआर नोंदवण्याबाबत पोलिसांकडून दिरंगाई घडल्याची टीका केली जाते आहे. मात्र लहान मुलगी पोलीस ठाण्यात आल्यानंतर लगेच वैद्यकीय तपासणीला पाठवले, तपासणीला किमान ३-४ तास लागतात. त्यानंतर तिच्याकडून पोलीस ठाण्यात जबाब नोंदवून घेतला. लहानग्या मुलीला अजून शरीराची ओळख नाही, तिच्यासोबत नक्की काय घडलं हे तिच्याकडून जाणून घेण्यासाठी वेळ लागला, असा खुलासा पोलिसांकडून केला गेला आहे असेही सांगितले.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, मविआ नेत्यांच्या अलीकडच्या काळातील काही वक्तव्यांचा विचार करता बदलापूरच्या दुर्दैवी घटने नंतरचे आंदोलन, रेल रोको हे सगळे मुद्दाम ठरवून होते आहे का याचा विचार सूज्ञ जनतेने करायला हवा असे आवाहनही यावेळी केले. तसेच काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो असे वक्तव्य केले. त्यापाठोपाठ नाना पटोले , प्रणिती शिंदे हे आंदोलनाची धग अधिक पेटवण्याच्या प्रयत्नात दिसले. आंदोलनकर्त्यांच्या हातात, ‘लाडकी बहीण योजना रद्द करा’, असे फलक का होते? संवेदनशील प्रसंगावेळी या लोकांच्या हातात असे बॅनर्स का होते असा सवालही यावेळी केला.

चित्रा वाघ यांनी सांगितले की, सरकारी वकील म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांना कपिल सिब्बल चालतात पण उज्वल निकम चालत नाहीत. खैरलांजी, कोपर्डी, कोल्हापूर बाल हत्याकांड, शक्ती मिल सारख्या अनेक दुर्दैवी घटनांमध्ये पीडित महिलांच्या बाजूने लढत नराधमांना कठोरात कठोर शिक्षा ज्यांनी दिली, ज्यांनी आत्तापर्यंत एकाही गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतले नाही ते उज्वल निकम आता या मंडळींना अचानक नकोसे झाले. मविआ सरकारच्या कार्यकाळात माताभगिनींच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भया पथकाची वाहने सुप्रिया सुळे त्यांच्या स्वत: च्या सुरक्षा ताफ्यात वापरत होत्या याचे त्यांना सोईस्कर विस्मरण झाले असल्याची टीकाही यावेळी केली.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *