नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याची माहिती दिली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य शासनाचा इरादा बदललेला नाही आणि केंद्र शासनाचा देखील वेगळा विचार नाही. असे स्पष्टपणे नमूद करून ‘ केंद्र शासनाने विमानतळ बांधकामाला परवानगी देताना ‘ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशा नावाने पूर्वी परवानगी दिली होती, त्यामध्ये नामविस्तार होऊन आता “लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे होईल. राज्य शासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसारच विमानतळास नाव देण्यात येईल’, असा प्रतिसाद पंतप्रधान मोदी यांनी दिला.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक सुरू होईल, तेव्हा ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशीच अधिकृत उद्घोषणा निश्चितपणे होईल. या ‘ड्राय रन’ कालावधीत विमान प्रवासी यांचे पुढील कालावधीचे आगाऊ बुकिंग नोंदवणे, तांत्रिक बाबींची सज्जता अशा स्वरूपाची कार्यवाही होईल, असे सांगितले.
शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठीचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी संमत केला असून राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन केंद्र शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविला आहे. केंद्र शासनाच्या स्तरावर अशा नामकरणासाठी निश्चित असे धोरण ठरविले जात असून नवीन धोरणानुसार विमानतळाचे नामकरण लवकरच होणार असल्याचेही यावेळी सांगितले.
पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांचा देखील नामविस्तार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह राज्यातील पुणे येथील सध्याच्या विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम यांचे नाव देण्यासाठीचा आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तिन्ही प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन असून राज्य शासनाच्या मागणीनुसार व नवीन धोरणानुसार नामविस्तारांना लवकरच मान्यता मिळणार आहे. इतर राज्यातील देखील प्रस्ताव मान्यतेसाठी प्रतीक्षेत आहेत.
|
विमानतळ नामकरण आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी आंदोलनकर्त्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. या आंदोलनातील गुन्ह्यांमुळे विमानतळावर नोकरी मिळण्यात अडचण येऊ नये, यासाठी हे गुन्हे रद्द करण्याचे निर्देश देण्यात येतील. काही आंदोलने कोविड काळात देखील झाले असल्याने काही आंदोलनकर्त्यांवर कोविड तरतुदीनुसार गुन्हे दाखल असून असे गुन्हे नियमानुसार न्यायालयाच्या परवानगीने मागे घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. |
यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी स्वागत करून प्रास्तविक केले. तसेच आमदार रवींद्र चव्हाण, लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार कपिल पाटील, खासदार सुरेश (बाळ्या) म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर व लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडली.
यावेळी आमदार महेश बालदी, माजी खासदार संजय पाटील, माजी खासदार संजीव नाईक, जगन्नाथ पाटील, राजू पाटील, सुभाष भोईर, जे. एम. म्हात्रे , जगदीश गायकवाड, दशरथ भगत, जे.डी. तांडेल यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
नामकरणासाठी सर्वपक्षीय एकमेव प्रस्ताव असून त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी देण्यात आले.
Marathi e-Batmya