मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, रेल्वे बोगी कारखान्यात स्थानिकांना प्राधान्य द्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा देण्याबाबत तोडगा काढणार

लातूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे बोगी कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या कारखान्यात लवकरच वंदे भारत रेल्वेच्या बोगींचे उत्पादन सुरू होणार असून, यामुळे सुमारे दहा हजार रोजगार निर्माण होतील. यामध्ये स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे, आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती मानसी उपस्थित होते. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत लातूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना, जिल्हा रुग्णालय आदीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रेल्वे बोगी कारखान्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांमध्ये आवश्यक ट्रेड्स सुरू करून युवकांना प्रशिक्षण द्यावे. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे सांगितले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा हस्तांतरित करण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मदर डेअरीच्या सहकार्याने हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव सादर करावा, त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे नमूद केले. जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे गतीने पूर्ण करावीत. घरणी, तिरू आणि देवर्जन या प्रकल्पांतून जलवाहिनींद्वारे सिंचनासाठी पाणी वितरण करण्याबाबत उपयुक्तता तपासून प्रस्ताव सादर करावा, असे सांगत हाडगा आणि मसलगा सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावीत. पांदण रस्त्यांवरील विद्युत खांब तातडीने हटवून रस्त्यावरील अडथळे दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक विकासकामांची माहिती दिली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यात सुरु असलेली विकासकामे, तसेच प्रस्तावित कामांविषयी माहिती सादर केली.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *