नांदेड-मुंबईः प्रतिनिधी
आगामी विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असलेल्या विरोधकांना विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळणार नसल्याचे काही तासांपुर्वींच जाहीर करून काही तासांचा अवधी उलटत नाही तोच विधानसभा निवडणुकीत आमची लढत वंचित बहुजन आघाडीसोबतच असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षांमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार पक्षाला रामराम ठोकत भाजपा आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष गांगरल्याच्या अवस्थेत पोहोचले. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता वंचित बहुजन आघाडीला राजकिय महत्व दिल्याने आगामी निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे नुकसान होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
निवडणुकीनंतर विरोधी पक्ष नेतेपदही वंचित बहुजन आघाडीचाच होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये केलं.
यावेळी शरद पवार हे मोठे नेते असून त्यांच्याबाबत मी काही वक्तव्य करणार नाही. अलिकडच्या दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीतले अनेकजण शरद पवार यांची साथ सोडून भाजपात येत आहेत. तेव्हा पवारांनी काळाची पावलं ओळखली पाहिजेत असंही ते म्हणाले.
केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने तीन लाख घरांना मंजुरी दिली आहे. यामध्ये जवळपास सव्वा लाख घरं महाराष्ट्रासाठी आहेत. शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीत आमची युती आहे आणि शंभर टक्के युती राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करत नारायण राणे यांच्याबाबत त्यांचा पक्ष भाजपात विलीन करायचा की नाही याचा निर्णय आम्ही शिवसेनेबरोबरील चर्चेनंतर घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वंचित टीम ए आणि काँग्रेस बी टीम झाल्याचे लोकसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे. त्याचमुळे आमचा खरा संघर्ष वंचित बहुजन आघाडीसोबत असणार राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya