मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टोक्ती, संकटातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. संकटांमध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी देण्याचा शब्द राज्यशासनाने पाळला असून देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी फडणवीस म्हणाले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित सुधाकरपंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड आदी उपस्थित होते.

राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी, वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात, तिथून याची सुरुवात करावी या उद्देशाने येथून कर्जमाफीची सुरुवात करण्यात येत आहे. त्यानुसार सहकार विभागाने १७ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली असून १३ हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ तारखेपूर्वीच जमा करण्यात येणार आहेत. यापुढे जसजशी बँकाकडून माहिती जमा होईल तसतशा पुढील याद्या जाहीर करून कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येईल. एकही पात्र शेतकरी या योजनेतून मागे राहणार नाही, असा विश्वासही दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ७.५ हॉर्स पॉवरच्या आतील कृषीपंपांची वीजबिल माफी देण्यासाठी दरवर्षी २४ ते २५ हजार कोटी रुपये राज्य सरकार आपल्या तिजोरीतून महावितरणला देते. आता कर्जमुक्तीबरोबरच यापूर्वीची या कृषीपंपांची थकीत वीज देयकांची रक्कमही माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ५० लाख शेतकऱ्यांचं ४८ हजार कोटी रुपयांचे वीजबिल माफ केलेले आहे. आता राज्यातल्या ७५ टक्के शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देतो आहोत. येत्या डिसेंबर किंवा मार्चपर्यंत १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यात येणार आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्जमाफी, विजदेयकांच्या रकमेची माफी याव्यतिरिक्त गतवर्षी शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सबसिडींच्या माध्यमातून, ठिबक सिंचन, खते, ट्रॅक्टर किंवा यांत्रिकीकरण आदींसाठी सुमारे ९५ हजार कोटी खर्च केले आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार अतिशय ताकदीने उभे आहे, असेही सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वारीची परंपरा शतकानुशतके चालली असून दरवर्षी लाखो वारकरी चालत चालत पंढरपूरपर्यंत येतात. वारीमध्ये प्रत्येकालाच पांडुरंगाचे दर्शन मिळतेच असे नसले तरी कोणी कळस दर्शन, कोणी मुख दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन घेतात आणि पांडुरंगाची भेट झाल्याचा अनुभव प्रत्येक वारकऱ्याला या ठिकाणी प्राप्त होतो. वारीच्या परंपरेत प्रत्येक व्यक्ती समोरचा वारकरी, व्यक्तीमध्ये आपल्या माऊलीचे दर्शन घेत असतो. आणि अत्यंत भावनिक आणि कौटुंबिक असा वारीचा सोहळा आपल्याला पंढरपूरमध्ये पाहायला मिळतो.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यावेळी विक्रमी असे ३५ लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरपूरला येत आहेत. जवळजवळ २१ किलोमीटरची दर्शनाची रांग यावेळी लागलेली आहे. मात्र राज्य शासन, जिल्हा प्रशासनाच्यावतीने अतिशय उत्तम सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. वारकऱ्यांच्या निवाससाठी जर्मन हँगर्स, तेथे पाद्य सेवा, वैद्यकीय सेवा आदी सर्व प्रकारच्या सेवा अतिशय उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. वारीची परंपरा अशीच वाढत राहणार असून त्याप्रमाणे दरवर्षी सुविधा देण्याचे काम करण्यात येईल, असेही सांगितले.

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत सर्वांचे १०० टक्के पुनर्वसन

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंढरपूरच्या कॉरिडॉर विकासाची जवळजवळ सर्व तयारी झाली आहे. काही थोड्या लोकांच्या मनात शंका असल्या तरी चर्चेतून त्या सर्व शंका दूर करून सर्वांचे चांगल्यात चांगले पुनर्वसन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये आजपर्यंत झालेल्या पुनर्वसनापेक्षा उत्तम, चांगलं आणि मोठं पुनर्वसन हे या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये देत आहोत. १०० टक्के लोकांचे समाधान करण्याचा उद्देश घेऊन हे काम आम्ही करत आहोत, असेही म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंढरपूरमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने ३०-३० लाख लोक येतात. वारकऱ्यांकरता आणि आता देशभरातून दर्शनकरिता येणाऱ्या भाविकांची योग्य व्यवस्था व्हाव्यात, या दृष्टीने खऱ्या अर्थानं या सगळ्या व्यवस्था येथे केल्या असून पंढरपूर कॉरिडॉरमुळे चांगल्या सुविधा निर्माण होतील, असेही म्हणाले.

२०१५-१६ मध्ये दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या कृषी प्रदर्शनाची सुरुवात केली. पंढरपूरला येणारा वारकरी हा शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार आहे. म्हणून त्यांच्यापर्यंत शेतीच्या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रयोग पोहोचले पाहिजेत, या दृष्टीने या कृषी प्रदर्शनाची सुरुवात झाली. राज्यातल्या उत्तम बाजार समित्यांमध्ये गणना होत असलेली ही बाजार समिती अतिशय उत्तम कारभार करत असून १६ कोटींपासून प्रचंड मोठी भरारी घेत समितीने मोठा विस्तार केलेला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बाजार समितीचा गौरव केला.

शेतीमध्ये ‘एआय’ला चालना; ‘महा विस्तार’ ॲपचा वापर करावा

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, आपल्या शेतीमध्ये आधुनिकता आली पाहिजे, उत्पादनाचा खर्च कमी करता आला पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचा नफा वाढला पाहिजे, अशा पद्धतीने आपण राज्यात वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताचे (एआय) महत्व ओळखून, देशात पहिल्यांदा महाराष्ट्राने शेतकऱ्यांकरिता ‘महा विस्तार’ नावाचे एआय ॲप तयार केले आहे. जवळपास ५० लाख शेतकऱ्यांनी महा विस्तारवर नोंदणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनीही या ॲपवर नोंदणी करून उपयोग करावा, असे आवाहन केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘महा विस्तार’ म्हणजे एक प्रकारचा एआय एजंट असून आपण त्याच्याशी संवाद साधून शेतीशी संबंधित खतांचा वापर, कीड प्रतिबंध, पाण्याचा वापर आदी सर्व विषयांवरील प्रश्नांची उत्तरे, ज्ञान, माहिती जाणून घेऊ शकता. आधुनिक शेतीच्या प्रयोगाचे व्हिडिओ त्याच्यावर आहेत. कुठल्याही नवीन पीक पद्धतीमध्ये काय केलं पाहिजे याची माहिती त्यात असून सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या बोली भाषेत पर्सनलाईझ्ड पद्धतीने तेथे मिळते. पुढील काळात ‘माती परीक्षण’पासून सर्व सुविधा, पद्धती या केवळ आपल्या मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येणार आहेत, असेही सांगितले.

भीमा नदीवर बॅरेजेस बांधण्याच्या मागणीच्या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आंतर राज्य लवादाच्या निर्णयाची बंधने पाळतानाच त्यातून मार्ग काढून कशा पद्धतीने हे बंधारे तयार करता येतील, या संदर्भातले निर्देश संबंधित विभागाला देण्यात येईल. तसेच चंद्रभागा नदीवरचा जो नवीन पूल आहे, तो आता ‘पूल कम बंधारा’ असा परिवर्तित करून त्याही ठिकाणी पाणी कसे अडवता येईल, याचाही प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दरवर्षी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये शिरणाऱ्या पुराच्या पाण्यावर डायव्हर्जन कॅनल आपण सुरू केला असून यावर्षीच त्याचे काम पूर्ण होत आहे. यामुळे ३५ ते ४० टीएमसी पाणी हे तेथून उजनीमध्ये आणण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह येथील दुष्काळी भाग आणि मराठवाड्याचा भाग या दोन्ही भागांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या पाण्यामुळे उजनीमधील मृत साठा वापरावा लागण्याची परिस्थिती पुढील काळात राहणार नाही.

मुख्यमंत्री फडणीस म्हणाले की, रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंढरपूरला तसेच सोलापूर जिल्ह्याला संपूर्ण दक्षिणेशी जोडण्याचे काम निश्चितपणे पूर्ण करू. लोणंद-पंढरपूर रेल्वेमार्गासाठी राज्यशासनाने पैसे दिले असून काम सुरू करायचे आहे. परंतु, पंढरपूर-विजापूर रेल्वेसाठीही मागील काळात केंद्र सरकारला विनंती केली असून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असेही म्हणाले.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजमाफी देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शेतकरी समृद्ध, मजबूत होईल अशा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात काम केले आहे. ही वारी वारकऱ्यांना आनंद देणारी स्वच्छ आणि सुंदर अशी वारी होत आहे. जवळपास ३५ लाख वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत. पंढरी कॉरिडॉरच्या माध्यमातून वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी पायाभूत सोयी निर्माण करण्याचा मानस मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र होईल, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रशांत परिचारक यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबविलेल्या योजनांचा गौरवपूर्ण उल्लेख करत कर्जमुक्तीबद्दल मुख्यमंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात ‘इन्फ्रामॅन : देवेंद्र फडणवीस- मेकिंग ऑफ महाराष्ट्रा’ या पुस्तकाचे तसेच निवासी मूकबधिर विद्यालय पंढरपूरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील दालनांना भेट देऊन माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात वारकरी, शेतकरी उपस्थित होते.

 

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाला सेवेतून बडतर्फ करून अटक करा

पेपरफुटी प्रकरणी संतप्त तरुणाई रस्त्यावर उतरून न्याय मागत असताना पोलिसांचे वागणे मात्र ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *