आणि मुख्यमंत्री ठाकरेंना आठवला त्यांच्या शाळेचा पहिला दिवस…. सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेऊया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी

आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. शाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. मात्र मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी  आहे, असेही ते म्हणाले.

कोरोनासाठीचे  निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, या प्रत्यक्ष तर शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, संचालक राहुल त्रिवेदी, टास्क फोर्स सदस्य डॉ.सुहास प्रभू, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) चे विकास गरड ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आज जेव्हा सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाणार आहेत. तेव्हामला माझे शाळेचे दिवस आठवत आहेत. सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची, नवीन वह्या-पुस्तके, गणवेश मिळायचे.आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू आहे.  मुलं ही फुलासारखी नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते या विषयावर टास्क फोर्सशी नियमित चर्चा होत असते. शाळा सुरु करताना वर्ग खोल्यांची दारे बंद नसावीत, हवा खेळती असावी, शाळेंचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. निर्जंतुकीकरण करताना मुलांच्या आरोग्याला अपाय होणार नाही याची देखील काळजी घ्यावी असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. पावसाळ्यामुळे तसेच इतर अनेक साथीचे रोग येत आहेत. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेवावे. स्वःताला बरे वाटत नसेल तर शंका आल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मुलांशी भावनिक संवाद साधणार – प्रा.वर्षा गायकवाड

आजपासून शाळा सुरु होत असल्या तरी काही दिवस मुलांशी भावनिक पातळीवर संवाद साधला जाणार आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधने यानुसार गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजन पूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये आपण अनेकदा शाळा सुरु करण्याबाबतचे प्रयत्न केले पण कोविड -१९ ची तीव्रता लक्षात घेवून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून आपण प्रत्यक्षपणे शाळा सुरु करू शकलो नसल्याचे त्यांनी सांगितले.

सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ

आज जरी ग्रामीण आणि शहरी भागातील काही शाळा आपण सुरु करीत असलो तरी काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन,ऑफलाईन पद्धतीने त्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ करीत  आहोत. विद्यार्थिनिहाय शैक्षणिक गरजा, उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांचे मुलभूत कौशल्य व अध्ययन नि:ष्पतीचे सर्वेक्षण करून शाळास्तरावर निश्चित व सातत्यपूर्ण आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अध्यापनाचे नियोजन, वेळापत्रक, उपस्थिती, साहित्य, पालक सहभाग, मूल्यमापन, अभ्यासेतर नियोजन, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक सुविधा, शारीरिक आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठीचे विशेष नियोजन करण्यात येणार आहे.

पण शिक्षण सुरु

मार्च २०२० पासून कोविड-१९ ची संसर्गता लक्षात आल्याने लॉकडाऊनमुळे शाळा तडकाफडकी बंद कराव्या लागल्यात. पण आपला शिक्षण विभाग मात्र निरंतर विद्यार्थ्यां पर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून निरंतर कार्यरत राहिला आहे. याबद्दल राज्य शैक्षणिक  संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेवून त्यांनी मागील १८ महिन्यात ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने अत्यंत परिणामकारक उपक्रम राबवले आहेत. रेडीओ, दूरदर्शन, व्हॉटसअप, युटुयब, फेसबुक, गुगल क्लासरूम या सर्व माध्यमाचा प्रभावी वापर करीत मुलांना त्यांच्या इयात्तानुरूप शिकत ठेवले आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षणचक्र सुरु रहावे– डॉ.सुहास प्रभू

‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ हा शासनाचा उपक्रम स्तुत्य असून विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्सने सुचविलेल्या सूचनांचे पालन करून शाळा सुरु होत आहेत, याबद्दल आनंद व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे चक्र सुरु रहावे अशी भावना टास्क फोर्सचे सदस्य आणि जेष्ठ बालरोग तज्ञ डॉ. सुहास प्रभू यांनी व्यक्त केली.

कोरोना कालावधीत जी मुलं शाळाबाह्य झाली असतील त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज डॉ. प्रभू यांनी व्यक्त केली.  पालक आणि शिक्षक यांनी सातत्याने संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.

शालेय शिक्षण विभागातर्फे शाळा सुरु होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा यांनी माहिती दिली. पुणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपस्थित असलेल्या आयुक्त विशाल सोळंकी यांनी आभार मानले. श्री विशाल गरड यांनी सूत्रसंचालन केले. शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या ध्वनीचित्रफितीचेही यावेळी अनावरण करण्यात आले.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, परिवहन विभागात बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

परिवहन विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत आरटीओ विभागातील बदल्या आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *