भाजपाच्या मातृसंस्थेचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारत भाजपा उमेदवार ना.गो.गाणार यांचा निम्याहून अधिक मतांच्या फरकाने पराभव करत काँग्रेसचे उमेदवार सुधाकर आडबले हे विजयी झाले. विशेष म्हणजे गाणार यांच्या प्रचारासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या. तरीही ना.गो.गाणार यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाने पलटी मारत गाणार हे आमचे उमेदवार नव्हते असा खुलासा करत पराभवापासून हात झटकण्याचा प्रयत्न केला.
नागपूर शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वादग्रस्त वक्तव्य केले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाने पाठिंबा दिलेले शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार हे भाजपाचे उमेदवार नव्हते. गाणार यांना भाजपाने पाठिंबा दिला होता. संपूर्ण भाजपची यंत्रणा गाणारांच्या प्रचाराला लागलेली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मतदानाच्या दिवशीही ठिकठिकाणी गाणारांसाठी भाजपाने बुथ लावले होते. प्रचारातही भाजपा नेते गाणार हे भाजपाचेच उमेदवार असल्याचे सांगत होते. गाणार हे भाजपाचे उमेदवार नव्हते तर ते शिक्षक परिषदेचे उमेदवार होते. भाजपाचे उमेदवार असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते असे स्पष्टीकरण देत पराभवापासून हात झटकण्याचा प्रयत्न केला.
Marathi e-Batmya