नीट पेपर फुटीवरून काँग्रेसने राज्य सरकारला धरले धारेवरः अजित पवार यांनी केली भूमिका स्पष्ट नाशिकमध्ये परराज्यातील विद्यार्थ्यांनी बोगस प्रमाणपत्रे काढून नीट परीक्षा दिली, सरकार झोपा काढत आहे का?

विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या नीट परीक्षेत झोल सुरू आहे. या परीक्षेला महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी बसतात. एवढा मोठा घोटाळा होऊन सरकारची भूमिका स्पष्ट नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शिक्षण मंत्री म्हणतात काही गडबड झाली आहे. मग सरकार जबाबदारी घेणार आहे की नाही असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नीट परीक्षेवरून सरकारला विभानसभेत धारेवर धरले.

प्रश्नोत्ताराच्या तासानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लक्षवेधी पुकारण्यात आली. त्यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर नाना पटोले यांनीही राज्य सरकारला धारेवर धरले.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. राज्यात मोर्चे निघत आहेत. नांदेड मध्ये १५ हजार विद्यार्थी रस्त्यावर आले होते. त्यामुळे सरकारने या परीक्षेबाबत भूमिका स्पष्ट करावी. उद्या बोगस डॉक्टर झाले तर लोकांच्या आरोग्याशी खेळ होईल. राज्यात काही लोकांना अटक झाली आहे याची देखील माहिती सरकारने द्यावी, अशी मागणीही यावेळी केली.

यावेळी काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले की, वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटच्या पेपर फुटीचे लोण महाराष्ट्रात आले असून याप्रकरणी लातूरमधून काही लोकांना अटक करण्यात आली आहे. पेपर फुटणे ही गंभीर बाब असून अशा पेपर फुटीमुळे शेकडो होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अशा घटनांना आळा बसावा म्हणून राज्य सरकार पेपर फुटीविरोधात कडक कायदा करणार आहे का? असा सवाल यावेळी राज्य सरकारला केला.

विधिमंडळात पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, पेपरफुटीच्या विषयासंदर्भात आणखी एक गंभीर बाब समोर आली असून परराज्यातील काही मुलांनी नाशिकमध्ये येऊन अपंग असल्याची बनावट प्रमाणपत्रे काढून परीक्षा दिली आहे. एकीकडे पेपरफुटी तर दुसरीकडे असे बोगस विद्यार्थ्यी परीक्षाचा लाभ घेत आहेत हा प्रकार होतकरू विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. यात प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे तर पालकांचा पैसा बरबाद होत आहे. नांदेडसह राज्याच्या अनेक भागात हजारो लोकांनी रस्त्यावर येऊन पेपर फुटीविरोधात मोर्चे काढले. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे असे म्हणतो मग सरकार काय झोपा काढत होते का ? असा सवालही यावेळी केला.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर उत्तर देताना म्हणाले की, वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाच्या ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची केंद्र आणि राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून वेगवेगळ्या यंत्रणांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. दोषींना अटक करण्यात आली आहे. भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश जारी केला आहे. त्याद्वारे दोषींवर कठोर कारवाईसह मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेची जबाबदारी पूर्वीप्रमाणे राज्यांकडे सोपविण्याचा विचारही पुढे आला. केंद्र सरकार त्यासंदर्भात तपासणी करुन निर्णय घेणार आहे. दिवसरात्र अभ्यास करुन प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन बांधिल असून यासंदर्भात विरोधी पक्षांनी सूचविलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल, अशी माहितीही यावेळी दिली.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *