मागील अनेक वर्षापासून गणेशोत्सवाच्या सण काळात सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांकडून कोकणात जाऊ गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा सुरु करण्याची चढाओढ लागत असे. त्यामुळे ज्या मतदारसंघात कोकणवासिय जास्त भागातील मतदार कम नागरिकांसाठी एक प्रकारचे आमिष म्हणून मोफत बसने कोकणात नेले जात असे. त्यानंतर आता कोकणवासियांकडे वाहन घेऊन जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर या वाहनांना टोल माफी देण्याचे प्रमाण राज्य सरकारकडून वाढले. मात्र आता टोलमाफी कोणी जाहिर करायची यावरून भाजपाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर एक महत्वाची माहिती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे गणेशोत्स्वाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना टोल माफी देण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रक त्यांच्या कार्यालयाकडून जाहिर करण्यात आले. तर काही वेळानंतर भाजपाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यालयाकडूनही एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले. विशेष म्हणजे या दोन्ही मंत्र्यांकडून जाहिर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकातील माहिती ही जवळपास सारखीच आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही श्रेय वादाची लढाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहिर केलेले प्रसिद्धी पत्रक खालीलप्रमाणे….
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी
सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर टोलमाफी जाहीर केली आहे. ही सवलत कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना आणि एसटी बसेसना लागू असणार आहे.
या सवलतीसाठी “गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन” नावाचे विशेष टोलमाफी पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठीही हेच पास वैध राहील. या निर्णयामुळे कोकणातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात मोठ्या संख्येने जात असतात. या टोलमाफीमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि खर्चात बचत होणार आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेशोत्सवाच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणातील गणेशभक्तांच्या उत्साहात निश्चितच भर पडणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालय (जनसंपर्क कक्ष) कडून जारि करण्यात आलेले प्रसिद्धी पत्रक खालील प्रमाणे
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.
यासाठी “गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत.ते
शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या संदर्भात जाहीरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे.
Marathi e-Batmya