देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष… समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्- उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील २ कोटी २० लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणींशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय शिंदे, शहाजी बापू पाटील, राम सातपुते, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त शितल उगले तेली, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे, ज्योती वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जून जुलैचे प्रतिमाह पंधराशे रुपये प्रमाणे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत. भाऊबीज नोव्हेंबर महिन्यात येत असल्याने राज्य शासनाने विचार करून याच महिन्यात भाऊबीज म्हणून थेट नोव्हेंबर महिन्याचे पैसेही बहिणींच्या बँक खात्यात जमा केले असल्याची माहिती दिली.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशभरात लखपती दीदी ही योजना सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून लाखो महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून लखपती होत आहेत. त्याच धर्तीवर राज्य शासनही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने योजना राबवत असून पहिल्या टप्प्यात राज्यात २५ लाख लखपती दिदी तयार करण्यात येणार आहेत, तर या पुढील राज्यात १ कोटी लखपती दीदी तयार करून प्रत्येक महिला वर्षाला किमान एक लाख रुपये स्वतः कमवतील यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील सर्व उपसा योजनांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार असून यासाठी ३ हजार ३६६ कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपंपासाठी दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यातील सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरून सौर पंप बसवून देण्यात येणार असल्याने पुढील २५ वर्ष विजेचा खर्च शेतकऱ्यांना येणार नाही. तसेच मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के फी माफी, लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलगी जन्मताच मुलीच्या नावावर शासन पैसे टाकत आहे, एसटी बस मध्ये महिलांना तिकीटामध्ये ५०% सवलत देण्यात आलेली आहे, अशी माहिती दिली.

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याने पुढील काळातही योजना अशीच चालू राहील. शेतकऱ्यांसाठी विज बिल माफी योजना आणलेली असून या अंतर्गत राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना १५ हजार कोटींची वीज बिल माफी देण्यात आल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्र निर्मितीमध्ये महिलांचे स्थान व योगदान खूप मोठे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरुवात केली. तसेच महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजनाही सुरू आहे त्यामुळे राज्यातील महिला समाधानी असून लाडकी बहीण योजनेतून ते आपले व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

अजित पवार पुढे म्हणाले की, राज्य शासनाने कांदा निर्यात बंदी उठवली तसेच तांदूळ निर्यात बंदीही उठवली आहे. दुधाला सप्टेंबर २०२४ मध्ये पाच रुपये प्रति लिटर वाढ देण्यात आलेली होती त्यात ७ रूपये वाढ करून प्रतिलिटर ३५ रुपये दुधाचा भाव ठरवून देण्यात आलेला आहे. शासन सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे असल्याने त्यांच्या हितासाठी अधिक लक्ष दिले जात आहे. पोलीस पाटील व कोतवाल यांचे मानधन दुप्पट करण्यात आले. आशा सेविका, गटप्रवर्तक व अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली. सरपंच, उपसरपंचाचे मानधनात ही दुप्पट वाढ करण्यात आली. अशा प्रकारे हे शासन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रास्ताविक केले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाले. व्यासपीठावर ते चालत येत असताना दोन्ही बाजूच्या उपस्थित शेकडो महिलांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना राख्या बांधल्या व ही योजना अशीच निरंतर चालू ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व रमाईमाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना व जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपसा सिंचन योजना तसेच अन्य योजनांच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली चित्रफितीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

उपसा जलसिंचन योजनांच्या सौरऊर्जीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

राज्यातील २४२ शासकीय व सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचसोबत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील वीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पायाभूत वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी २ हजार ७७३ कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.

लाडक्या बहिणींना धनादेश वाटप –

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना एकूण ४८१ कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत, त्याचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात १५ महिला लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच पिंक ई- रिक्षा, लेक लाडकी योजना, मोफत गॅस सिलेंडर यासह अन्य योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही धनादेश व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

About Editor

Check Also

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ९४ उमेदवार मुंबई पालिका निवडणूकीत ९४ उमेदवारांमध्ये ५२ लाडक्या बहिणी निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार ;लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३० उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर केली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *