आज आठवड्याचा पहिला दिवस मात्र सोमवारी पहाटेपासून सकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत अतिवृष्टी झाली. जवळपास ३०० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. त्याचा परिणाम मुंबईतील रस्ते वाहतूकीबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल सेवेवरही परिणाम झाला. त्यामुळे शनिवार-रविवार सुट्टीसाठी आपापल्या मतदारसंघात गेलेले अनेक आमदार मुंबईला जाणाऱ्या रेल्वेत बसले खरे पर्यंत मुंबईच्या उपनगरातच अडकून पडले. तसेच विधिमंडळ आणि शासकीय कर्मचारीही पावसामुळे लोकलसेवेचा खोळंबा झाला. त्यामुळे नियमित वेळेत सुरु होणारे विधिमंडळाचे कामकाज अपुऱ्या कर्मचारी आणि आमदारांच्या गैरहजेरीमुळे दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केले. मात्र पुन्हा दुपारी एक वाजता सभागृहाचे कामकाज सुरु झाले असता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
दुपारी विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज विधानसभेचे कामकाज नियमित करण्यात आले आहे. या कामकाजात अंतिम आठवडा प्रस्ताव आणि लक्षवेधी चर्चा, कपात मागण्या सारखे महत्वाचे विषय कार्यक्रम पत्रिकेत देण्यात आले आहेत. मात्र मुंबईत पहाटेपासून पडलेल्या पावसामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. तसेच दुपारपासून पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज एका दिवसाने वाढविण्यात यावे अशी मागणी केली.
त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यास उत्तर देताना म्हणाले की, पावसामुळे अनेक आमदार मुंबईत पोहचू शकले नाहीत. याशिवाय अनेकजण रेल्वेत अडकून पडले आहेत. याशिवाय कामकाज पत्रिकेतील कामकाजही पूर्ण होणे गरजेचे आहे. यापार्श्वभूमीवर अधिवेशनाचे कामकाज पूर्ण करणेही आवश्यक आहे. सध्या पडलेल्या पावसाचा आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेलेले आहेत. ते सध्या इथे नसल्याने याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री परत आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून कामकाज सल्लागार बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे उत्तर दिले.
यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात येत असल्याचे जाहिर करत सभागृहाचे कामकाज मंगळवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याचे जाहिर केले.
Marathi e-Batmya