बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी बीड तालुक्यातील मौजे पिंपळगाव घाट, मौजे हिंगणी खुर्द, मौजे आहेर चिंचोली, खामगाव, नांदूर हवेली गावांची केली पाहणी

बीड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नद्यांना आलेल्या पुरामुळे नदी काठावरील अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावात नदीचे पाणी घरात व शेतशिवारात घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला.

यावेळी अजित पवार यांनी बीड तालुक्यातील मौजे पिंपळगाव घाट, मौजे हिंगणी खुर्द, मौजे आहेर चिंचोली, खामगाव, नांदूर हवेली तर शिरुर कासार तालूक्यातील खोकरमोहा आणि येवलवाडी आणि गेवराई तालूक्यातील इटकूर या गावांना भेट देवून येथील पाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधत म्हणाले की, जनतेवर आता जे नैसर्गिक संकट आले ते खुप मोठे असून, बाधितांना शासन मदत करणार आहे. तसेच या पुरामुळे अनेक नागरिक बेघर झाले असून, त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात यावी. शासनामार्फत नुकसानग्रस्त भागातील बाधीत नागरिकांना अन्न-धान्य आणि ५ हजार रुपयांची आर्थिक मदत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे ते यावेळी म्हणाले. शासन नागरिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, कोणीही काळजी करू नये. या नैसर्गिक संकटामुळे बाधित नागरिकांना शासन सर्वोतोपरी मदत करणार आहे. येणाऱ्या यंत्रणेमार्फत संकटात असलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरु आहे. आता बरेच पाणी ओसरले असल्याने उद्यापासून पंचनामे जास्त गतीने सुरु होतील. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करावेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच जिल्ह्यातील किती हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे व किती नुकसान झाले याची नेमकी आकडेवारी प्राप्त होईल. तसेच ज्या भागात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर त्या भागात अतिवृष्टी झाल्याचा नियम आहे. परंतु ज्या ठिकाणी ६५ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला, परंतू त्याठिकाणी जास्त नुकसान झाले असल्यास तेथील परिस्थिती बघून बाधीतांना शासन मदत करणार असल्याचे सांगितले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की,तसेच या नैसर्गिक संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी जे काही करावे लागेल ती मदत शासनमार्फत करण्यात येणार आहे. येणाऱ्या २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याकरीता सर्व नागरिकांना काळजी घ्यावी लागेल. यासाठी जिल्हा प्रशासन देखील काम करत आहे. राज्यातील काही भागात पाऊस झाल्याने काही ठिकाणी एअरलिफ्ट करावे लागले, तर काही ठिकाणी एनडीआरएफची टीम आणि आर्मीची टीमने देखील बचाव कार्य केल्याचे यावेळी सांगितले.

आजच्या बीड दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड तालुक्यातील चौसाळा ते पिंपळघाट रोडवरील अनुसया नदीवरील वाहून गेलेल्या पुलाची पाहणी केली. संबंधीत विभागास याठिकाणी नविन पुल तयार करण्याचे निर्देश दिले.  तसेच बीड तालुक्यातीलच हिंगणी खुर्द या गावास भेट देवून येथील गावातील घरात आणि शाळेत नदीचे पाणी घुसल्याची पाहणी केली. तसेच या गावचा अनेक वर्षाचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले असता, गावकऱ्यांची पुनर्वसनासाठी संमती असेल तर पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यानंतर त्यांनी शिरूर तालुक्यातील खोकरमोहा येथील पाझर तलाव फुटल्याची पाहणी केली. तसेच या तलावाच्या दूरुस्तीसाठीचे अंदाजपत्रक तयार करून तलावाची दुरूस्ती करून घेण्याच्या संबंधीतांना सूचना दिल्या. तसेच शिरूर तालुक्यातीलच येवलवाडी येथील ओढ्यावरील पूल वाहून गेल्याची पाहणी करुन संबंधीत विभागास याठिकाणी नविन पुल तयार करण्याबाबतची तात्काळ कार्यवाही करण्यास सांगितले. यानंतर बीड तालूक्यातील आहेर चिंचोली येथे भेट देवून येथील ओढ्यावर पुल नसल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी याठिकाणी पुलाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच बीड तालूक्यातील खामगाव आणि नांदुर हवेली गावात सिंदफणा नदीचे पाणी घरात घुसल्याने झालेल्या नुकसाणीची पाहणी केली. याबरोबरच गेवराई तालुक्यातील इटकूर येथे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी आमदार विक्रम काळे, विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, बीड तालूका तहसिलदार चंद्रकांत शेळके, शिरुर कासार तालूका तहसिलदार सुरेश घोळवे, गेवराई तालूका तहसिलदार संदिप खोमणे, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *