दिपक केसरकर म्हणाले, आमचं बाळासाहेबांवर आणि धनुष्यबाणावर प्रेम… केवळ त्यांच्यामुळेच हे सगळं झालंय

केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या फुटीवर शिक्कामोर्तब करत या दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण वापरण्यास मनाई करणारा आदेश काल शनिवारी रात्री दिला. तसेच अंधेरी पोट निवडणूकीसाठी पर्यायी पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचविण्याची सूचना दोन्ही गटाला केली. या आज रविवारी सकाळपासून शिंदे गट आणि ठाकरे गटात खलबतांना वेग आला. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाची बाजू मांडण्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत गटाची बाजू मांडली.

यावेळी बोलताना दिपक केसरकर म्हणाले, निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही मान्य केला आहे. खऱ्या अर्थाने धनुष्यबाण चिन्हावर आमचाच अधिकार आहे. आमच्याबरोबर आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, नगरसेवक आहेत. आज धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने दुख झाल्याचे जे सांगतात, तेच या निर्णयाला जबाबदार आहेत. आम्ही वेळेवर कागदपत्रे दाखल केले असताना त्यांनी वेळोवेळी तारखा मागितल्या आहेत. त्यामुळेच आयोगाने हा निर्णय दिला.

प्रत्येकवेळी तारखा मागायच्या, कागदपत्र सादर करायचे नाही, वरून निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं तर आम्हाला जबाबदार धरायचं, हा केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. आगामी अंधेरी पोटनिवडणुकीत लोकांची सहानुभूती कशी मिळेल, याकडे त्यांचे लक्ष आहे. त्यांनी जाणीवपूर्वक आयोगात प्रतिज्ञापत्र सादर केले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

आमच्याकडे जे बहूमत आहे. त्यानुसार आम्ही आोगाकडे ‘धनुष्यबाण’ चिन्हाची मागणी करणार आहे. आमची बाजू खरी आहे. त्यामुळे हे चिन्ह आम्हालाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. मात्र, आज ज्याप्रकारे आयोगाबाबत ट्वीट केलं जात आहे, ते योग्य नाही. भारतात लोकशाही आहे आणि ती शाबूत ठेवण्याचे काम निवडणूक आयोगाने केले आहे. आमच्या विरोधात निकाल दिला, तर ती संस्था चुकीची ही भूमिका घेणं चुकीचं आहे. हे लोकशाहीला घातक आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाने असा निर्णय पहिल्यांदाच घेतला असे नाही. यापूर्वी तामिळनाडूमध्येही जयललिता आणि पनिरसेल्वम यांच्या बाबतीत घेतला होता. आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे, त्यामुळे आमचं धनुष्यबाणावर प्रेम आहे. मात्र, लोकांची सहानुभूती मिळवायची, निवडणुका जिंकायच्या, विचारधारेपासून दूर जायचे, हा प्रकार सध्या सुरू आहे, असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करणार विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची माहिती

मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *